माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 06:09 IST2025-08-15T06:09:03+5:302025-08-15T06:09:25+5:30

हेमलकसा-कारमपल्ली चकमकीत धाडसी कारवाई

President Gallantry Medal awarded to 7 soldiers from Gadchiroli who sacrificed their lives in anti Maoist campaign | माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक

माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक

गडचिरोली : घनदाट जंगल, प्रतिकूल सशस्त्र भौगोलिक स्थितीत माओवाद्यांविरुद्ध जीवाची बाजी लावून शौर्य गाजविणाऱ्या सात जवानांना पोलिस सेवेतील अतिशय मानाचे समजले जाणारे राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पदकांची घोषणा झाली, यात महाराष्ट्रात गडचिरोलीपोलिसांनी नेहमीप्रमाणे आपला दबदबा राखला.

शौर्यपदकांची घोषणा देशभरात पोलिस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपर्तीच्या हस्ते पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

भूसुरुंग स्फोट घडवून हल्ला; चोख प्रत्युत्तर, धाडसाने मोहीम फत्ते 

२०१७ मध्ये सी- ६० जवान कोठी पोलिस ठाण्यातून वाहनांद्वारे भामरागडला परतत होती. माओवाद्यांनी हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. जखमी व अडकलेल्या जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत सी-६० जवानांनी माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत मोहीम फत्ते केली. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदकप्राप्त जवानांचे स्वागत केले आहे.

पोलिस शौर्य पदकाचे हे आहेत मानकरी 

सन २०२५ मध्ये जिल्हा पोलिस दलातील सहायक निरीक्षक नेताजी बंडगर, सहायक उपनिरीक्षक मनोहर महाका, हवालदार मनोहर पेंदाम, अंमलदार प्रकाश कन्नाके, अतुल येगोलपवार, हिदायत खान हे पोलिस शौर्य पदकाचे मानकरी ठरले. शहीद जवान सुरेश तेलामी यांना मरणोत्तर पोलिस शौर्य पदक मिळाले आहे.

पाच वर्षांत शौर्य पदकांचे द्विशतक 

माओवादविरोधी मोहिमांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल मागील पाच वर्षात जिल्हा पोलिस दलातील अधिकारी-अंमलदारांना तीन शौर्य चक्र, २१० पोलिस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आठ पदके प्राप्त झाली आहेत.
 

Web Title: President Gallantry Medal awarded to 7 soldiers from Gadchiroli who sacrificed their lives in anti Maoist campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.