पुजाऱ्यांकडे जाणाऱ्या रुग्णांना तत्काळ आवरावे; बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:58 IST2025-07-02T17:56:16+5:302025-07-02T17:58:05+5:30
Gadchiroli : पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाने अलर्ट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Patients going to priests should be stopped immediately; strict action against bogus doctors directed
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांनी आजार झाल्यास अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर विश्वास न ठेवता तातडीने अधिकृत वैद्यकीय उपचार घ्यावेत, यासाठी व्यापक जनजागृती करून जागरूकता करावी, बोगस डॉक्टरांना चाप लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पंडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, नमन गोयल, कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, अनेक नागरिक आजही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे न जाता पुजाऱ्यांकडे जातात. पुजारी रुग्णांची दिशाभूल करतात. यामुळे उपचारासाठीचा महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो. ही सवय बदलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे. महसूल, पोलिस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी आणि नागरिकांना योग्य उपचार घ्यायला प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये शिक्षकांनीदेखील सक्रिय सहभाग घ्यावा, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक आणि ग्रामस्थांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
तत्काळ पोलिसांना कळवा
- आशा वर्कर, पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक व तलाठी यांनी जादूटोणासंबंधी घटनांची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना द्यावी.
- कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, २ भामरागड आणि कोरची या भागांमध्ये अशा प्रथांचे प्रमाण अधिक असल्याने यंत्रणेने विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या. सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बोगस डॉक्टरांवर संयुक्त समिती करणार कारवाई
सभेत बोगस डॉक्टरांच्या वाढत्या समस्येबाबतही चर्चा झाली. कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या किंवा अधिकृत वैद्य म्हणून नोंद नसलेल्या व्यक्तींनी रुग्णांवर उपचार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा व्यक्तींविरोधात पोलिस व तालुकास्तरीय समित्यांनी संयुक्त धाडसत्र राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.