एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:57 IST2025-10-15T18:54:28+5:302025-10-15T18:57:34+5:30
जगताप प्रकरणावरून अजित पवार यांना सवाल : 'स्थानिक' निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव

On one hand, MLAs make controversial statements, on the other hand, parties talk about secularism; how can secularists come to power with BJP?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप वादग्रस्त वक्तव्ये करताहेत, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत आहे. भाजपच्या सोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे, असा सवाल करून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
येथील निवासस्थानी १४ ऑक्टोबर रोजी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कथित वादग्रस्त विधानांवरून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे दाखवून काँग्रेसची मते वळविण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत मान डोलवायची, अल्पसंख्यांक व बहुजनांवर अन्याय करायचा. असे त्यांचे धोरण असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
'स्थानिक' निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती आहे. त्यांनी केलेल्या सर्वेचे अहवालही विरोधात आहेत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे, सरकारने तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पाने पुसली, अशी टीका त्यांनी केली.
धर्मरावबाबा - भाजपच्या वादावरही टीका
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपने विधानसभेत मला पराभूत करण्यासाठी ५ कोटी खर्च करून पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केले, असा खळबळजनक आरोप १२ ऑक्टोबर रोजी चामोर्शीतील सभेत केला होता. या वादावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांनी केलेली ही खेळी आहे. एकमेकांवर आरोप करून लोकांना संभ्रमित करण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. अहेरीतील असुविधा व पायाभूत समस्यांवरूनही त्यांनी धर्मरावबाबा यांच्यावर निशाणा साधला.