'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:14 IST2025-12-08T16:14:02+5:302025-12-08T16:14:26+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली जात असल्याने गडचिरोलीमध्ये परिचारिकेने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला

'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
गडचिरोली जिल्ह्यातील एका उपकेंद्रात कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय कंत्राटी परिचारिकेने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अश्लाघ्य मागण्या, सततची मानसिक छळवणूक आणि दोन वर्षांपासून वेतनवाढ रोखून धरल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (६ डिसेंबर) सायंकाळी ही घटना घडली. सध्या परिचारिका जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स समोर आल्यानंतर आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
परिचारिकेच्या पतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर 'पैसे नको... मला तूच पाहिजेस' असा कथित घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप केला आहे. वेतनश्रेणी न देण्यासाठी उपकेंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कसे वेठीस धरले जाते, याविषयीही विभागात चर्चा सुरू आहे.
घटनेच्या दिवशी परिचारिका कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी परतली. ती प्रचंड तणावात दिसत होती. रात्री जेवण करून पतीला झोप लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. तत्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
प्राथमिक उपचारांनंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणामुळे कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सीईओ, डीएचओंची धाव
घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी रविवार, ७ डिसेंबर रोजी रुग्णालयात भेट देऊन परिचारिकेच्या पतीशी सविस्तर संवाद साधला. मात्र, आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
अधिकारी काय म्हणाले?
संबंधित चॅटिंगची माहिती पतीने दिली आहे. संपूर्ण प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे, असे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.
परिचारिका अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाही. त्यांचा जबाब घेतलेला नाही. पतीने तक्रार दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.