बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

By संजय तिपाले | Published: January 20, 2024 12:26 PM2024-01-20T12:26:47+5:302024-01-20T12:27:16+5:30

गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारीलाही वाघाने एका महिलेला ठार केले होते

missing farmer dead body found Tiger attack or accident Shocking Incidence in Moolchera taluka | बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

संजय तिपाले, गडचिरोली: दोन महिलांचा बळी घेऊन दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. मात्र याच वनपरिक्षेत्रात २० जानेवारीला एका बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तीचे धड आढळले असू असून शिर गायब आहे. त्यामुळे हा घातपात की वाघाचा बळी असा संभ्रम निर्माण झाला आहे.
 बापूजी नानाजी आत्राम ( ४५, रा. लोहारा ता. मूलचेरा) असे मयताचे नाव आहे. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मार्कंडा वनपरिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या रेंगेवाही उपक्षेत्रातील कूप क्र. २९३ मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

जिल्ह्यात व्याघ्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७ आणि १५ जानेवारी रोजी सुषमा देवदास मंडल(५५,रा. चिंतलपेठ), रमाबाई मुंजमकर ( ५५, रा. कोळसापूर) या दोन महिलांचा शेतात काम करताना वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला. तत्पूर्वी गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारी रोजी वाघाने एका महिलेला ठार केले होते. 

वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या 'रॅपिड रिस्पॉन्स टीम'ला पाचारण केले होते. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. याच जंगल परिसरातील रेंगेवाही उपवनक्षेत्रात २० जानेवारीला बापूजी आत्राम या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी केवळ धड असून शिर गायब आहे, त्यामुळे व्याघ्रहल्ला व घातपात अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: missing farmer dead body found Tiger attack or accident Shocking Incidence in Moolchera taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.