दंतेवाडात माओवादाचे कंबरडे मोडले ! ६३ जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; १८ महिलांचा समावेश
By संजय तिपाले | Updated: January 9, 2026 16:19 IST2026-01-09T16:18:19+5:302026-01-09T16:19:45+5:30
Gadchiroli : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानात ९ जानेवारी रोजी सर्वांत मोठी घडामोड घडली. दंतेवाडा जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल ६३ जहाल माओवाद्यांनी शस्त्र ठेवले.

Maoism's backbone broken in Dantewada! 63 Maoists laid down their arms; 18 of them were women
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानात ९ जानेवारी रोजी सर्वांत मोठी घडामोड घडली. दंतेवाडा जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल ६३ जहाल माओवाद्यांनी शस्त्र ठेवले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने माओवाद्यांनी शस्त्रे टाकल्यामुळे हिंसक चळवळीचे कंबरडे मोडल्याची चर्चा आहे.
स्थानिक गोंडी भाषेत 'लोन वर्राटू' म्हणजे 'घरी परत या'. दंतेवाडा पोलिसांनी ही भावनिक आणि प्रभावी मोहीम सुरू केली आहे. गावोगावी नक्षलवाद्यांच्या नावे फलक लावून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, आतापर्यंत शेकडो नक्षल्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.
याप्रसंगी सीआरपीएफच्या दंतेवाडा उपविभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) राकेश चौधरी, दंतेवाडा येथील पोलिस अधीक्षक गौरव राय, सीआरपीएफच्या १११ व्या, १९५ व्या आणि २३० व्या बटालियनचे कमांडंट, अप्पर पोलिस अधीक्षक रामकुमार बर्मन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
जहाल दलम सदस्यांचा समावेश
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी संघटनेतील अंतर्गत कलहाचा पाढाच वाचला. वरिष्ठ नेते आमचे शोषण करतात, भेदभाव करतात आणि आम्हाला विकासापासून रोखतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे आपल्याला सन्मानाने जगता येईल, या आशेने या सर्वांनी हा निर्णय घेतला. यामध्ये अनेक जहाल दलम सदस्य आणि जनमिलिशिया कमांडरचा समावेश.
"'लोन वर्राटू' या मोहिमेचे हे सर्वांत मोठे यश आहे. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांना तात्काळ सानुग्रह अनुदान दिले असून, त्यांचे पूर्ण पुनर्वसन केले जाईल. त्यांना घर, शेती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील."
- गौरव राय, पोलिस अधीक्षक, दंतेवाडा, छत्तीसगड