जवानांचा ‘महास्ट्राईक’ ! सुकमा- बिजापूर सीमेवर १४ माओवादी ठार
By संजय तिपाले | Updated: January 3, 2026 13:36 IST2026-01-03T13:35:13+5:302026-01-03T13:36:57+5:30
नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी माेठी कारवाई : कोंटा एरिया कमिटी सचिव ‘मंगडू’चा समावेेश

'Maha Strike' of jawans! 14 Maoists killed on Sukma-Bijapur border
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी ३ जानेवारी रोजी माओवाद्यांना मोठा धक्का दिला आहे. सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात पहाटे राबविलेल्या मोहिमेत १४ माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यात १२, तर बिजापूर जिल्ह्यात २ मृतदेह हाती लागले असून, मृतांमध्ये कोंटा एरिया कमिटी सचिव ‘मंगडू’चा समावेेश आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे डीआरजी पथकांनी शुक्रवारी पहाटे शोधमोहीम सुरू केली होती. पहाटे सुमारे ५ वाजता बिजापूर जिल्ह्यात पहिली चकमक उडाली. त्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये जोरदार गोळीबार झाला. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांचा आधार घेत माओवाद्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा दलांच्या चोख प्रत्युत्तरामुळे त्यांचा डाव फसला. चकमकीत ठार झालेल्यांत जहाल माओवादी वेट्टी मुका उर्फ मांगडू याचा समावेश आहे. तो सुकमाच्या गोगडू गावचा रहिवासी असून अनेक वर्षांपासून चळवळीत सक्रिय होता. घातक माओवादी म्हणून त्याची ओळख होती, त्याच्यावर तेथील सरकारने आठ लाखांचे इनाम जाहीर केले होते. उर्वरित माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून ठार झालेल्यांत आणखी काही मोठ्या कॅडरचे माओवादी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एके-४७ सह शस्त्रसाठा हस्तगत
चकमक संपल्यानंतर करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत १४ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. माओवाद्यांकडून एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या घातक रायफल्ससह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मोहीम अजूनही सुरू
सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या माहितीनुसार, परिसरात अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. जवानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोहिमेचे ठिकाण गोपनीय ठेवण्यात आले असून, कारवाई अद्याप सुरूच आहे.