तेंदूपत्ता संकलनासाठी मजुरांची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 01:58 IST2017-05-10T01:58:33+5:302017-05-10T01:58:33+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्त्याला चार ते पाच पट भाव मिळाला आहे. त्यामुळे ग्रामसभा व मजूर यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तेंदूपत्ता संकलनासाठी मजुरांची आयात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्त्याला चार ते पाच पट भाव मिळाला आहे. त्यामुळे ग्रामसभा व मजूर यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त तेंदूपत्ता संकलन व्हावा, यासाठी काही ग्रामसभांनी दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्ता संकलन अधिक होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी तेंदूपत्त्याला केवळ चार ते पाच हजार रुपये प्रति स्टँडर्ड बॅग (गोणी) एवढा भाव मिळाला होता.कमी भाव मिळाल्याने ग्रामपंचायतीसह मजूरही नाराज होते.
स्पर्धेमुळे यावर्षी भाव चार ते पाच पट अधिक म्हणजे किमान १२ हजार ते १९ हजार रुपये प्रतिगोणी याप्रमाणे मिळाला आहे. एक तेंदूपत्त्याचा पुडा १२ रुपये ते १९ रुपयांचा होणार असल्याने तेंदू मजुराला प्रत्येक दिवशी दीड ते दोन हजार रुपये मजुरी मिळणार आहे. त्यामुळे मजुरांचीही मागणी वाढली आहे.