लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ३६ वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून जंगल दऱ्यांमध्ये वावरणारा कुख्यात नक्षलवादी नेता सी. नारायण राव ऊर्फ सुरेश याने ३० मार्च रोजी आपल्या आठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. या मोठ्या कारवाईमुळे आंध्र प्रदेशातील माओवाद आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा पोलिस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी केला आहे.
आत्मसमर्पण केलेला सी. नारायण राव हा 'आंध्र-ओडिशा बॉर्डर' झोनचा सचिव म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर तब्बल दीड कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. १९९० मध्ये माओवादी चळवळीत सामील झालेला सुरेश हा अनेक भीषण गुन्ह्यांमध्ये सामील होता. विशेष म्हणजे २०१८ मध्ये विशाखापट्टणम येथे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमेश्वर राव यांची झालेली निर्घृण हत्या, तसेच २००१ मध्ये सीआय गांधी आणि १९९७ मध्ये मुख्य आरक्षक नरेंद्र दास यांच्या हत्येचा तो मुख्य सूत्रधार होता.
या ९ माओवाद्यांनी टाकली शस्त्रे
नारायण रावसोबत करतम लच्छू, पोडियम राजे, करतम अदामे, मुचाकी मासा, माडवी जोगी, मुचाकी लक्ष्मण, माडवी अदाम आणि कदिथी हुर्रे या जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार सुरेशला २५ लाख रुपये, तर अन्य सहकाऱ्यांना १ ते ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
माओवादाचा सूर्य मावळला?
केंद्राने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे जे ध्येय ठेवले होते, ते आज आंध्र प्रदेशात पूर्ण झाले आहे. आता राज्यात एकही सक्रिय माओवादी कॅडर शिल्लक नाही, असे पोलिस महासंचालक गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रेहाऊंड्स, इंटेलिजन्स विंग आणि जिल्हा पोलिस दलाच्या समन्वयामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
विचारधारेला घरघर, विकासाला साथ
स्थानिक लोकांचा कमी होत चाललेला पाठिंबा, जुनाट झालेली विचारधारा आणि सरकारचे विकासात्मक प्रकल्प यामुळे नक्षलवाद्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. आदिवासी भागातील वाढता संपर्क आणि पोलिसांच्या जनमैत्री अभियानामुळे नक्षलवादाचा प्रभाव ओसरल्याचा दावा आंध्र प्रदेश पोलिसांनी केला आहे.
Web Summary : Notorious Maoist leader Suresh, wanted in multiple killings including a legislator, surrendered with eight accomplices. Police claim Maoism is now eradicated in Andhra Pradesh due to successful operations and developmental initiatives.
Web Summary : विधायक सहित कई हत्याओं में वांछित कुख्यात माओवादी नेता सुरेश ने आठ सहयोगियों के साथ आत्मसमर्पण किया। पुलिस का दावा है कि सफल अभियानों और विकासात्मक पहलों के कारण आंध्र प्रदेश में अब माओवाद खत्म हो गया है।