२६५ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:26 AM2021-02-22T04:26:36+5:302021-02-22T04:26:36+5:30

विसोरा : पूर्णतः नैसर्गिक, सेंद्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतात हरितक्रांतीनंतर प्रथमच संकरित बियाणे आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा श्रीगणेशा ...

Integrated pest management of vegetable crops on 265 hectares | २६५ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

२६५ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

googlenewsNext

विसोरा : पूर्णतः नैसर्गिक, सेंद्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतात हरितक्रांतीनंतर प्रथमच संकरित बियाणे आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा श्रीगणेशा झाला. देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनीही धानासोबत भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली. मात्र अधिक उत्पादन व्हावे आणि रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक खते, औषधांच्या अतिवापर जाऊ लागला. परिणामी जमिनीचा पाेत घसरुन पर्यावरणाची हानी झाली. ही हानी टाळण्यासाठी देसाईगंज तालुका कृषी विभागाने तालुक्यातील एकूण भाजीपाला पिकाच्या ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्राला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आणले आहे.

पिकावरील किडीच्या व्यवस्थापनाकरिता वापरले जाणारे चिकट सापळे, लैंगिक सापळे यांची ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन खरेदी शेतकरी करतोय. भाजीपाला पिकाचे अधिक उत्पादन देणाऱ्या नवनव्या संकरित जातीचे वाण आता बाजारात येत आहेत. त्यांची लागवड करून शेतकरी भाजीपाला पिकवत आहेत, परंतु पिकावरच्या रोगांमुळे रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिवापर केला जातो. त्यामुळे भाजीपाला खाल्ल्यामुळे रसायनांचे अंश मानवी शरीरात प्रवेश करतात. तसेच जमिनीची सुपीकता कमी करतात. हाच रासायनिक मिश्रण पाण्यावाटे नदीत, पाण्यात मिसळतो आणि पर्यावरणाचे नुकसान सुद्धा होते. मानवी आरोग्यावर घातक असे विपरीत परिणाम होतात. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला पिकांवर होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी आणि मानवी आरोग्य व पर्यावरण संवर्धन, रक्षण करण्यासाठी पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक होते.

हीच बाब हेरून तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांच्या पुढाकाराने तालुक्यातील एकूण ४४५.९० हेक्टर जमिनीवरील तब्बल ६० टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावरचे भाजीपाला पिके एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आणण्यात आले आहे. भाजीपाला पिकाची बी लावताना चिकट सापळे, लैंगिक सापळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, सावंगी, शिवराजपुर, मोहोटोला, किन्हाळा या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेतली जातात. केवळ शेती उपयोगी तंत्राचीच माहिती नव्हे तर शेतकऱ्यांना ऑनलाईन खरेदी करण्याबाबत कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांचे सहकार्य लाभत आहे.

बाॅक्स

असे लावावे कीड व्यवस्थापन सापळे

कीड व्यवस्थापनासाठी निळे व पिवळ्या रंगाचे चिकट सापळे, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, लैंगिक सापळे (माशीभक्षिका) यांचा वापर केला जात आहे. कारले, भोपळा, लवकी यासारख्या वेलवर्गीय पिकांवर खोड पोखरणारी अळी असते. ही (माशी) अळी पिकाचे पूर्ण नुकसान करते. अशावेळी लैंगिक सापळ्याचा वापर केला जातो. लैंगिक सापळ्यांमुळे अळीचे जीवनचक्र थांबते. लैंगिक सापळ्यांचा उपयोग करून भाजीपाला पिकावरील तब्बल ६० टक्के किडींचे व्यवस्थापन होते, असे नीलेश गेडाम यांनी सांगितले. भाजीपाला पिकाच्या खोडामध्ये रसशोषण करणाऱ्या किडी संपूर्ण पिकास नष्ट करतात. त्यासाठी निळ्या तसेच पिवळ्या रंगाची चिकट सापळे पिकात जागोजागी लावले जातात. चिकट सापळ्यांवर किडे चिकटतात. परिणामी किडीचे प्रजोत्पादन थांबते, कीड आटोक्‍यात येते. प्रत्यक्षात भाजीपाला शेतात चिकट सापळ्यांवर किडीचे थर चिकटलेल्या अवस्थेत दिसतात. यावरून चिकट सापळे प्रभावी असल्याचे दिसते.

कोट

येत्या एक-दोन वर्षांत देसाईगंज तालुक्यातील संपूर्ण भाजीपाला पिकांचे क्षेत्र एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्याला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभण्याची अपेक्षा आहे.

नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, देसाईगंज

Web Title: Integrated pest management of vegetable crops on 265 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.