'मी आमदार बोलतोय.. माझा पीए येईल, त्याच्याकडे दिलेल्या कामांची यादी मंजूर करा' चक्क अधिकाऱ्यांनाच फसवण्याचे नवीन रॅकेट उदयास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:12 IST2025-10-08T14:06:47+5:302025-10-08T14:12:06+5:30
Gadchiroli : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागात मंत्र्यांचे नाव सांगून अधिकाऱ्यांना दबावात घेणाऱ्या कथित टोपी गँगच्या कारनाम्यांची चर्चा सुरू असतानाच चक्क आमदार असल्याचे भासवून मी सांगितलेली कामे मंजूर करा, अशा प्रकारचा फोन एका अधिकाऱ्यास गेला.

'I am speaking as an MLA.. my PA will come, approve the list of works given to him' A new racket has emerged to cheat the officials themselves
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागात मंत्र्यांचे नाव सांगून अधिकाऱ्यांना दबावात घेणाऱ्या कथित टोपी गँगच्या कारनाम्यांची चर्चा सुरू असतानाच चक्क आमदार असल्याचे भासवून मी सांगितलेली कामे मंजूर करा, अशा प्रकारचा फोन एका अधिकाऱ्यास गेला. अधिकाऱ्याने व्हिडीओ कॉल करण्यास सांगितल्यावर संबंधिताची भंबेरी उडाली. त्यानंतर हे प्रकरण आमदारांपर्यंत पोहोचले, पोलिसांत तक्रारही झाली; पण तोतयाने आमदारांचे पाय धरले, त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
त्याचे झाले असे, महसूलमधील एका अधिकाऱ्यास सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात एक कॉल आला. समोरून 'मी आमदार बोलतोय,' असे म्हटले. अधिकाऱ्यांनी जी नमस्कार साहेब.. म्हणत प्रतिसाद दिला. त्यावर समोरून माझा पीए येईल, त्याच्याकडे दिलेल्या कामांची यादी मंजूर करा, असे फर्मान सोडले. मात्र, जिल्ह्यात नवख्या असलेल्या या अधिकाऱ्याने संबंधित आमदारांसोबत दोन प्रशासकीय बैठकांत उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे त्यांचा आवाज परिचित होता. या अधिकाऱ्यांनी लगेचच आमदारांना कळविले.
राजमुद्रेसह व्हिजिटिंग कार्ड अन् वसुली....
सूत्रांनुसार, तोतयाने यापूर्वी स्वीय सहायक असल्याचे भासवून राजमुद्रेसह स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड छापले होते. प्रशासकीय अधिकारी व मंत्रालयात हे कार्ड दाखवून तो सहज वावरायचा, त्याच्या वसुलीचे कारनामेही भलतेच चर्चेत आहेत. खनिज प्रतिष्ठान निधीतून त्याने सात कोटींची कामे प्रस्तावित केली होती.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय मान्यता रद्द करून त्यास दणका दिला होता. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून त्याने नहरासाठी संपादित जमिनीचा जादा मोबदला मिळवून देतो, असे सांगून पैसे उकळले होते, तथापि, नंतर या तोतयाला वाचविण्यासाठी पक्षातीलच दोन पदाधिकाऱ्यांनी आमदारांकडे वजन वापरले, अशी चर्चा आहे.