हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
By संजय तिपाले | Updated: November 21, 2025 18:10 IST2025-11-21T18:08:55+5:302025-11-21T18:10:01+5:30
पोलिसांनी आरोप फेटाळले : प्रवक्ता अभयच्या नावाने जारी झाले पत्रक

Hidma killed in fake encounter? Maoists make serious allegations in leaflet
गडचिरोली : पाचशेपेक्षा अधिक जवानांच्या मृत्यूचा मास्टरमाईंड, जहाल माओवादी नेता व पीएलजीए कमांडर माडवी हिडमासह पंधरा जणांना आंध्रप्रदेश पोलिसांनी बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप २१ नोव्हेंबर रोजी केंद्रीय समितीने केला आहे. हिडमाचा मृत्यूनंतर त्याला मिळालेल्या सहानुभूतीनंतर आता माओवाद्यांनी पत्रक जारी करुन केलेल्या गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे.
माओवादी संघटनेचा प्रवक्ता अभय याच्या हिंदी भाषेतील दोन पानी पत्रक २१ नोव्हेंबरला समोर आले. यात म्हटले आहे की, हिडमा आणि त्याचे काही सहकारी उपचारासाठी विजयवाडा शहरात गेले होते. मात्र, काही जवळच्या लोकांनी ही बाब सुरक्षा दलाला कळवली. यावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना १५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. १८ नोव्हेंबरला सर्वांना ठार करून मारेदुमिल्लीच्या जंगलात चकमक झाल्याची खोटी कहाणी रचण्यात आली. पोलिसांनी काही शस्त्रही जप्त केल्याचा दावा केला. हे सर्व बनावट असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे.दरम्यान, पोलिसांनी आधीच या आरोपांचे खंडण केले असून या पत्रकानंतर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अंत्यसंस्काराला गर्दी, साेशल मीडियात सहानुभूती
माओवादी संघटनेने पत्रकामध्ये हिडमाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करीत श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे हिडमाच्या मृत्यूनंतर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमा भागामध्ये समाज माध्यमावर हिडमाबद्दल सहानुभूती दर्शवणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. नक्षल नेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये मोठी गर्दी उसळल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या अंत्ययात्रेलाही मोठी गर्दी झाली होती.
देवजीचे गूढ कायम
आंध्र प्रदेशात ५० हून अधिक माओवाद्यांना अटक करण्यात आली. यात सर्वोच्च माओवादी नेता थिप्पीरी तिरुपती ऊर्फ देवजी याच्या अंगरक्षकांचा समावेश आहे. मात्र, अद्याप देवजीचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, नक्षल संघटनेने जारी केलेल्या पत्रकात देवजीबद्दल मौन बाळगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.