दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय
By संजय तिपाले | Updated: June 2, 2023 15:01 IST2023-06-02T15:01:18+5:302023-06-02T15:01:57+5:30
लेकींचाच डंका: सहा हजारावर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय
गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पध्दतीने संकेतस्थळावर २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. यंदा गतवर्षीच्या तुलनेत गुणवत्तेचा टक्का घसरला, पण तरीही गडचिरोली जिल्ह्याने ९२.५२ टक्के गुणांसह नागपूर विभागात तृतीयस्थान पटकावले. बारावीनंतर दहावीतही निकालात मुलींनीच दबदबा राखला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात दहावीची परीक्षा झाली होती. जिल्ह्यातून एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थी प्रविष्ठ होते. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ६ हजार १५७ विद्यार्थी प्रथम तर ४ हजार ११४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ३७४ इतकी आहे. दरम्यान, २०२२ मध्ये जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.६२ टक्के इतका होता. मात्र, जिल्हा नागपूर विभागात सर्वांत तळाशी होता. यंदा निकालाचा टक्का घसरुनही गडचिरोलीने विभागात तृतीयस्थान मिळवले.
दहावीत मुलीच ठरल्या गुणवंत
एकण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ७ हजार ३८२ मुले व ७०७३ मुलीं असे एकूण १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण १३ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रत्येकी ६ हजार ६८७ मुले व मुलींचा समावेश आहे. मुलांच्या गुणवत्तेची टक्केवारी ९०.५८ असून मुलींचा टक्का ९४.५४ इतका आहे.