मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधम जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:14 IST2025-10-02T17:13:03+5:302025-10-02T17:14:36+5:30
Gadchiroli Crime News: कोरची शहरात सायकलवर सरपण विक्रीसाठी आलेल्या ५५ वर्षीय नराधमाने १३ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार केला. जिल्हा हादरवून टाकणारी ही धक्कादायक घटना १ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडून त्यास अटक केली.

मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधम जेरबंद
गडचिरोली - कोरची शहरात सायकलवर सरपण विक्रीसाठी आलेल्या ५५ वर्षीय नराधमाने १३ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार केला. जिल्हा हादरवून टाकणारी ही धक्कादायक घटना १ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडून त्यास अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बंडू शहारे (५५, रा. हेटाळकसा, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मतिमंद मुलीला फुस लावून बांधकाम सुरू असलेल्या घरात नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जवळच्याच टपरीवरील एका महिलेच्या लक्षात ही बाब आली. तिने तक्रारदारास सांगताच दोन आशा सेविकांसोबत त्या घरात धाव घेतली असता आरोपी मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला.
तक्रारदार आणि आशा सेविका यांनी पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मात्र, आरोपी सायकलवरून पसार होण्याचा प्रयत्न करीत असताना तक्रारदाराच्या आरडाओरडीनंतर उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ११७/२५ नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर कलम ६४(२)(i),(k), ५५ भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुकुंद देशमुख हे तपास करीत आहेत.
आरोपी बंडू शहारे यास २ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.