गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 18:30 IST2019-11-30T18:23:10+5:302019-11-30T18:30:00+5:30
भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
2 ते 8 डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून पीएलजीए या नक्षल संघटनेचा वर्धापन दिन सप्ताह पाळल्या जातो. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यासोबतच नक्षल चळवळीत नवीन लोकांना समाविष्ठ करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असतो. गेल्या दोन दिवसात नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी तसे बॅनर लावून पत्रकबाजीही केली. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविली आहे. यातच लाहेरी भागातील जंगलात पोलिसांच्या सी-60 पथकाचे जवान गस्त करत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांकडून गोळीबार झाला. त्यामुळे सावध पवित्रा घेत पोलीस पथकाने नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले.
पोलिसांचा दबाव पाहता नक्षलवादी जंगलात पळून गेले. पोलिसांनी काही अंतर पाठलाग करत परिसरात शोधमोहीम राबविली असता पोलिसांच्या गोळीने मृत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. वृत्त लिहिपर्यत त्यांची ओळख पटली नव्हती.