लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड-आंध्र सीमावर्ती भागात माओवाद्यांच्या बालेकिल्ल्याला आहे. पाच लाख रुपयांचे इनाम असलेली जहाल महिला माओवादी पोडियम लक्ष्मी हिने आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात सोमवारी ११ मे रोजी पोलिसांसमोर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले.
पोडियम लक्ष्मी ही मूळची छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील उसूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातील रहिवासी आहे. ती माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य अंतर्गत २ सीआरसी पीएलजीए बटालियनची सक्रिय सदस्य म्हणून दीर्घकाळापासून छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात सक्रिय होती. मात्र, शासनाचे प्रभावी पुनर्वसन धोरण आणि नक्षलवाद्यांच्या पोकळ विचारसरणीला कंटाळून तिने मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. तिने अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील एटका पोलिस कॅम्पमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज मीणा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
लक्ष्मीला शासनाकडून तातडीची सानुग्रह मदत सुपूर्द करण्यात आली असून, आता तिला पुनर्वसन धोरणांतर्गत घर आणि रोजगाराची संधी मिळणार आहे.
पत्रकातून आगपाखड, 'देवजी'ला ठरवले गद्दार !
एका बाजूला आत्मसमर्पण सत्र सुरू असतानाच माओवादी संघटनेच्या उत्तर तालमेल कमिटीने तेलंगणात पत्रक जारी करुन आगपाखड केली. पत्रात माओवाद्यांनी चळवळ कमकुवत होत असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वरिष्ठ नेते 'देवजी' याने आत्मसमर्पण केल्याने संघटनेचा तीळपापड झाला असून, पत्रातून 'गद्दार" आणि 'दुश्मनचा एजंट' ठरविले आहे.
माओवादी संघटना बिथरली
हे पत्रक म्हणजे नक्षलवाद्यांच्या वैफल्याचा पुरावा आहे. मोठे नेतेच आता हिंसेचा मार्ग सोडत असल्याने संघटना बिथरली आहे, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Feared Maoist Podium Lakshmi, carrying a ₹5 lakh reward, surrendered to Andhra Pradesh police. Frustrated with Maoist ideology and drawn by rehabilitation efforts, she laid down arms. The surrender highlights the weakening of Maoist influence in the region.
Web Summary : पांच लाख के इनाम वाली कुख्यात महिला माओवादी पोडियम लक्ष्मी ने आंध्र प्रदेश पुलिस के सामने आत्मसमर्पण किया। माओवादी विचारधारा से मोहभंग और पुनर्वास प्रयासों से आकर्षित होकर उसने हथियार डाल दिए। आत्मसमर्पण क्षेत्र में माओवादी प्रभाव के कमजोर होने को दर्शाता है।