डुम्मी नाल्यावरील पूल धोकादायक

By Admin | Updated: September 5, 2016 01:35 IST2016-09-05T01:35:27+5:302016-09-05T01:35:27+5:30

तालुका स्थळापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्यावरील पुलाच्या खालची बाजू दिवसेंदिवस अधिकच खचत चालली असल्याने

The Dummy Nallah pool is dangerous | डुम्मी नाल्यावरील पूल धोकादायक

डुम्मी नाल्यावरील पूल धोकादायक

पुलाच्या खालची माती उखडली : मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली
एटापल्ली : तालुका स्थळापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्यावरील पुलाच्या खालची बाजू दिवसेंदिवस अधिकच खचत चालली असल्याने सदर पूल कधीही कोसळून पावसाळ्यादरम्यान मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदर पुलाच्या दुरूस्तीकडे किंवा नवीन पूल निर्मितीकडे दुर्लक्ष होत चालले आहे.
डुम्मी नाल्याच्या पलिकडे डुम्मी जव्हेली यांच्यासह इतरही गावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने डुम्मी नाल्यावर १५ ते २० वर्षांपूर्वी पाईप टाकून पूल तयार केला. पावसाचे प्रमाण ज्यावेळी जास्त होते. त्यावेळी पाईपमधून पाणी पूर्णपणे पास होऊ शकत नाही. त्यामुळे काही पाणी पुलावरूनही वाहत राहते. जवळपास या पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात तीन ते चार फुटांपेक्षा अधिक पाणी राहते. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात किमान पाच ते सहा वेळा सदर पूल पाण्याखाली येतो. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे पुलाच्या खालचे पिचिंग पूर्णपणे निघून गेली आहे व माती सुध्दा वाहून जाण्यास सुरूवात झाली आहे. स्लॅबलेवलच्या खालचे दोन ते तीन फुटापर्यंतची माती वाहून गेली आहे. त्यामुळे पूल वेगळे झाले आहे. या पुलावरून चारचाकी वाहन गेल्यास सदर पूल कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पुलाच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Dummy Nallah pool is dangerous