जिल्ह्यातील 663 ठिकाणचे पिण्याचे पाणी देत आहेत आजाराला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:25+5:30
पाण्यामध्ये आर्यन, फ्लाेराईड, क्लाेराईड, नायट्रेट आदी घटक आढळून येतात. हे घटक एका विशिष्ट प्रमाणात असल्यास ते पाणी आराेग्यासाठी याेग्य मानले जाते. मात्र जमिनीतील बदलामुळे कधी-कधी पाण्यात या घटकांचे प्रमाण अतिशय कमी किंवा जास्त हाेण्याची शक्यता असते. असे पाणी आराेग्याला धाेकादायक मानले जाते.

जिल्ह्यातील 663 ठिकाणचे पिण्याचे पाणी देत आहेत आजाराला आमंत्रण
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एप्रिल ते जून या कालावधीत गावातील जलसुरक्षकामार्फत सार्वजनिक स्रोतांच्या पाण्याचे १० हजार ४८२ नमुने गाेळा करण्यात आले. त्यापैकी ६६३ ठिकाणचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. या ठिकाणी काेणतीही उपाययाेजना न करता या ठिकाणचे पाणी पिल्यास आराेग्याला धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाण्यामध्ये आर्यन, फ्लाेराईड, क्लाेराईड, नायट्रेट आदी घटक आढळून येतात. हे घटक एका विशिष्ट प्रमाणात असल्यास ते पाणी आराेग्यासाठी याेग्य मानले जाते. मात्र जमिनीतील बदलामुळे कधी-कधी पाण्यात या घटकांचे प्रमाण अतिशय कमी किंवा जास्त हाेण्याची शक्यता असते. असे पाणी आराेग्याला धाेकादायक मानले जाते.
तसेच पाण्यात शेवाळ असल्यास तेही पाणी धाेकादायक मानले जाते. त्यामुळे वर्षातून दाेनवेळा म्हणजेच पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याची तपासणी केली जाते. गाेळा केलेले नमुने गडचिराेली, अहेरी, आरमाेरी, चामाेर्शी, कुरखेडा या ठिकाणी असलेल्या शासकीय प्रयाेगशाळांत तपासणीसाठी पाठविले जातात. पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक व अनुजैविक अशी दाेन प्रकारे तपासणी केली जाते. एखाद्या ठिकाणच्या जलस्रोतामध्ये घटकांचे प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणचे पाणी पिण्यास प्रतिबंध घातले जातात.
अनुजैविकदृष्ट्या पाणी पिण्यास अयाेग्य असल्यास ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या जातात.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
पिण्याचे पाणी कधी-कधी अनुजैविक घटकांमुळे दूषित हाेते. अशावेळी पाणी उकळून पिणे हा सर्वांत चांगला उपाय आहे. विशेष करून ग्रामीण भागातील विहिरींचे जलस्रोत दूषित हाेतात. त्यामुळे विहिरीतील पाणीसुद्धा दूषित हाेण्याचा धाेका राहतो. पाणी उकळल्यामुळे जीवजंतू नष्ट हाेतात.
पाण्याच्या जलस्रोताच्या सभाेवताल स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. वर्षातून किमान एकदा तरी पाण्याची तपासणी करून घ्यावी. पाणी पिण्या अयाेग्य असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरू नये.
- प्रशांत गाेलांगे,
सहायक भूवैज्ञानिक, गडचिराेली.
खासगी व्यक्तीही करू शकते तपासणी
जलसुरक्षकामार्फत केवळ सार्वजनिक जलस्रोतांचे नमुने घेतले जातात. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या घरच्या बाेअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याची तपासणी करायची असल्यास तसा अर्ज जवळपासच्या प्रयाेगशाळेत करावा लागताे. गडचिराेली, अहेरी, आरमाेरी चामाेर्शी, कुरखेडा या ठिकाणी शासकीय पाणी तपासणी प्रयाेगशाळा उपलब्ध आहेत. पाणी तपासणीसाठी जवळपास ४५० रुपये शुल्क आकारले जाते.