शेतकऱ्याच्या आत्महत्येस जिल्हाधिकाऱ्यांना धरले जबाबदार; पत्रक सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 14:36 IST2022-09-16T14:35:08+5:302022-09-16T14:36:11+5:30
नक्षलवाद्यांचा पत्रकातून आराेप :

शेतकऱ्याच्या आत्महत्येस जिल्हाधिकाऱ्यांना धरले जबाबदार; पत्रक सोशल मीडियावर व्हायरल
गडचिराेली : एटापल्ली तालुक्यातील मलमपाड येथील अजय दिलराम टाेप्पाे या ३८ वर्षीय शेतकऱ्याने १ सप्टेंबर राेजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येसाठी गडचिराेलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा जबाबदार असल्याचा आराेप नक्षलवाद्यांनी केला आहे. याबाबतचे पत्रक जिल्ह्यातील साेशल मीडियावर फिरत आहे.
नक्षल पत्रकात म्हटले आहे की, ४० वर्षांपूर्वी मलमपाड येथे उराव समाजाचे आदिवासी नागरिक वास्तव्यास आले. या समाजालाही वन कायद्याअंतर्गत शेतीचा पट्टा मिळायला पाहिजे हाेता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीची बाजू घेत टाेप्पाेला शेतीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले. सुरजागड परिसरात सुरू असलेल्या लाेहखनिजाच्या उत्खननामुळे सभाेवतालच्या शेतीचे माेठे नुकसान हाेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. गडचिराेली जिल्ह्यात जनतेच्या बाजूने लढणाऱ्याला माओवादी ठरवून पाेलीस त्याची हत्या करतात किंवा त्याला कारागृहात टाकले जाते ही नित्याचीच बाब झाली आहे, असे नक्षल पत्रकात म्हटले आहे. हेर पत्रक ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी’ पश्चिम सब झाेनलचा श्रीनिवास यांनी काढले आहे.
जिल्हाधिकारी म्हणतात, टाेप्पाेची आत्महत्या काैंटुंबिक कारणातून
जिल्हाधिकारी यांनी ८ सप्टेंबर राेजी टाेप्पाेच्या आत्महत्येबाबत खुलासा जाहीर केला आहे. टाेप्पाेच्या नावे शेतजमीन नाही. त्याच्यावर काेणतेही कर्ज नसल्याचे आढळून आले आहे. त्याने काैंटुबिक कारणातून आत्महत्या केली. सुरजागड लाेहप्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दिल्या आहेत. टाेप्पाेच्या आत्महत्येला प्रशासन किंवा आपण जबाबदार असल्याचा आराेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे