बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:54 IST2017-06-27T00:54:26+5:302017-06-27T00:54:26+5:30
प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले.

बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल
देवराव होळी यांचे प्रतिपादन : सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले. आता जातीय विषमता दूर करण्यासाठी बंधूत्वाची भावना निर्माण केली पाहिजे, त्याकरिता लोकशाही प्रणालीत शासन व प्रशासनातील यंत्रणेने समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान ठेवून त्या पद्धतीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, जि. प. चे समाजकल्याण अधिकारी पेंदाम, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पांडे, नंदू काबरा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. डॉ. होळी म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार व सोयीसुविधा निर्माण करून देण्याचे तसेच दीनदुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले, असे ते म्हणाले.
जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी शाहू महाराज यांच्या कार्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. समाजातील उपेक्षित लोकांना मोठ्या शिक्षणाची संधी मिळून मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळाली. हे शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, संचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सुरेश पेंदाम यांनी मानले.
अपंग-अव्यंग विवाह योजनेतून मदत
सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नरेश लहानूजी नारनवरे व आरती नारनवरे या दाम्पत्याला आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच समाजकल्याण विभागाच्या निवासी शासकीय शाळेतून विशेष प्रावीण्यप्राप्त मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रफुल बापू आलमवार व किरण समय्या जनगाम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.