अन् बामनपेठच्या तलावात उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर
By Admin | Updated: May 13, 2017 02:05 IST2017-05-13T02:05:33+5:302017-05-13T02:05:33+5:30
कोनसरी येथील लोक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशील भागात जंगलालगत

अन् बामनपेठच्या तलावात उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर
तलाव खोलीकरणाचे उद्घाटन : अतिसंवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : कोनसरी येथील लोक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशील भागात जंगलालगत असलेल्या बामनपेठच्या तलावात हेलिकॉप्टर उतरविले. त्यानंतर येथील मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचे त्यांनी स्वत: उद्घाटन केले.
याप्रसंगी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार, मार्र्कंडा कं. च्या सरपंच अनिता अवसरमोल, गंगाधर पोटवार, संजय पंदिलवार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार कायम पाठीशी राहणार असून शासनातर्फे शेतकऱ्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका शाळकरी मुलीस काही प्रश्न विचारले. मात्र त्या मुलीने समर्पक उत्तरे दिली नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील लक्तरे वेशीवर टांगल्याचे यावेळी स्पष्ट झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मामा तलावाची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
बंदोबस्त पीएसआयच्या भरवशावर
अतिसंवेदनशील बामनपेठ गावातील जंगल परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी दौरा होता. मात्र त्यांच्या बंदोबस्तासाठी या बामनपेठ परिसरात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस दर्जाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पोलीस बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे यांनी सांभाळली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अतिसंवेदनशील भागात नियोजित दौरा असतानाही पोलीस विभागाचा निष्काळजीपणा दिसून आला. याचीही चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली होती.