बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात
By संजय तिपाले | Updated: May 20, 2025 15:59 IST2025-05-20T15:54:35+5:302025-05-20T15:59:36+5:30
तीन महिलांचा समावेश; ३६ लाखांचे होते बक्षीस

बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात
संजय तिपाले, गडचिरोली: जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना २० मे रोजी भामरागडच्या बिनागुंडा गावातून ताब्यात घेतले. यात तीन महिला माओवाद्यांचा समावेश असून त्यांना अटक केली आहे तर दोघांची कसून चौकशी सुरू आहे. अटकेतील तिघीही छत्तीसगड राज्यातील आहेत. पाच जणांवर मिळून ३६ लाखांचे इनाम होते.
माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (२८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), प्लाटून क्र. ३२ ची कमांडर पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (१९, रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर), प्लाटून क्र. ३२ ची सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९ , रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर ) यांचा समावेश आहे. एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार असे एकूण ७ हत्यार (अग्निशस्त्रे) जप्त करण्यात आले आहेत.
लाहेरी उप पोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसले असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियानचे उपअधीक्षक विशाल नागरगोजे हे सी - ६० चीसात पथके , केंद्रीय राखीव दलाचे जवान यांच्यासह मोहिमेवर रवाना झाले.
... म्हणून केला नाही गोळीबार
२० मे रोजी सकाळी संपूर्ण गावाला जवानांनी घेरले. हिरवे - पिवळे गणवेश असलेल्या पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. यावेळी काही माओवादी पळून गेले. तिघींना अटक केली असून इतर दोघांच्या वयाबाबत ठोस पुरावे नसल्याने खातरजमा करण्यात येत आहे.
कोणावर किती बक्षीस?
१०३ माओवाद्यांना २०२२ पासून आतापर्यंत जवानांनी अटक केली आहे. विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमलीवर महाराष्ट्र शासनाचे १६ लाख, कमांडर पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी ८ लाख व सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९ , रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर ) हिच्यावर चार लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेले होते.