नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; तरीही भीती झुगारून लेकीची ‘आपल्या’ लोकांना साथ

By मनोज ताजने | Published: January 31, 2023 12:26 PM2023-01-31T12:26:30+5:302023-01-31T12:26:50+5:30

गडचिरोलीच्या दुर्गम भागात देताहेत डॉक्टर दाम्पत्य सेवा

Bharti Bogami madia doctor from gadchiroli supporting her people by provide healthcare services | नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; तरीही भीती झुगारून लेकीची ‘आपल्या’ लोकांना साथ

नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; तरीही भीती झुगारून लेकीची ‘आपल्या’ लोकांना साथ

googlenewsNext

गडचिरोली : बारावीला असताना तिच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी अमानुषपणे हत्या केली. त्या कटू आठवणींपासून दूर जाऊन तिलाही भौतिक सुविधा उपभोगत सुखी जीवन जगता आले असते. पण ते नाकारत एका लेकीने बालपणापासून ज्या वातावरणात राहिले, तेथील लोकांचे दु:ख, वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयाेग करण्याचे ठरविले. नक्षलवाद्यांची भीती झुगारून तिच्या या संकल्पाला पतीनेही तेवढ्याच समर्थपणे साथ दिली. आज हे डॉक्टर दाम्पत्य त्या भागातील गोरगरीब आदिवासींसाठी मोठा आधार बनले आहे.

ही कहाणी आहे भामरागड तालुक्यातील लाहेरी या छोट्या गावात बालपण गेलेल्या डॉ. भारती बोगामी आणि डॉ. सतीश तिरणकर या डॉक्टर दाम्पत्याची. गेल्या ५ वर्षांपासून हे दाम्पत्य स्वखुशीने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. या अनोखा संकल्प आणि सेवाभावाबद्दल ‘लोकमत’ने डॉ. भारती यांना बोलते केले असताना त्यांनी आपली कहाणी सांगितली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती असलेले त्यांचे वडील मालू कोपा बोगामी यांची २००२ मध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली. पुढे आईला पॅरालिसिसचा झटका आला. पुण्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाला असताना भारती यांना बोन ट्युमर (हाडांचा आजार) झाला. पण आर्थिक स्थिती व्यवस्थित नसताना सर्व संकटांवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. आज त्यांचे पतीही त्यांच्या या संकल्पात त्यांना साथ देत आहेत.

बाबा आमटेंचे वाक्य कायम स्मरणात

डॉ. भारती या अहेरी येथे आपल्या आत्याकडे अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी होत्या. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यांच्या वडिलांच्या हत्येची धक्कादायक बातमी कळली. पण हे मोठे दु:ख पचवत वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याऐवजी परीक्षा देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यावेळी बाबा आमटे यांनी कौतुकाची थाप देत त्यांना म्हटले, ‘भूतकाळातून शिकायचे असते आणि भविष्याकडे चालायचे असते. बाळा, तू आज जो निर्णय घेतला असाच भविष्यातही घेत राहा’. त्यांचे हे वाक्य मला सतत प्रेरणा देत असतात, असे डॉ. भारती म्हणाल्या.

अरेंज मॅरेज, पण पतीचीही मिळाली साथ

डॉ. सतीश तिरणकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील. गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणाऱ्या काही मराठवाड्यातील शिक्षकांनी ते स्थळ सुचविले. डॉ. सतीश पहायला आले आणि २०१७ मध्ये अवघ्या पाच दिवसात त्यांचा विवाहसुद्धा आटोपला. पण तत्पूर्वी डॉ. भारती यांनी त्यांच्याकडे खऱ्या गरजवंतांना सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. सतीश यांनी समर्थपणे साथ देत दिलेला शब्द पाळला आहे.

Web Title: Bharti Bogami madia doctor from gadchiroli supporting her people by provide healthcare services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.