माओवादी चळवळीला आणखी एक धक्का ! दीड कोटींचे बक्षीस असलेल्या बंडीने तेलंगणात केले आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:32 IST2025-10-28T20:32:09+5:302025-10-28T20:32:35+5:30
Gadchiroli : बंडी प्रकाश हा माओवादी चळवळीतील जुना आणि प्रभावशाली नेता आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी त्याने सांभाळली होती.

Another blow to the Maoist movement! Bandi with a bounty of Rs. 1.5 crore surrenders in Telangana
गडचिरोली : तब्बल ४५ वर्षे माओवादी संघटनेत कार्यरत असलेले वरिष्ठ नेता आणि तेलंगणा राज्य समितीचे सदस्य बंडी प्रकाश उर्फ प्रभात याने २८ ऑक्टोबर रोजी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याने आत्मसमर्पण केले. विविध राज्यांत त्याच्यावर एकूण दीड कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
बंडी प्रकाश हा माओवादी चळवळीतील जुना आणि प्रभावशाली नेता आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी त्याने सांभाळली होती. शरण येण्यापूर्वी तो ‘नॅशनल पार्क एरिया ऑर्गनायझर’ म्हणून काम पाहायचा. भूमिगत होण्यापूर्वी त्याने ‘सिंगरेनी वर्कर्स युनियन’चे अध्यक्षपद सांभाळले होते. त्याच्या शरणागतीकडे सरकारने नक्षलवाद निर्मूलन मोहिमेतील मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.
ऑक्टोबरच्या मध्यात गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने तब्बल ६० सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये जहाल नेता भूपेशसह २१० नक्षलवाद्यांनी संविधान हाती घेत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसांपूर्वी कांकेर जिल्ह्यात १३ महिलांसह २१ वरिष्ठ कॅडरने एके-४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले.
नक्षलमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
माओवादी नेता बंडी प्रकाश याचे आत्मसमर्पण तेलंगणातील नक्षल चळवळीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता तेलंगणा या तिन्ही राज्यांत होत असलेल्या सलग आत्मसमर्पणामुळे नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असल्याचे चित्र दिसत आहे.