Aggressive Women to Drunkenness | दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक

दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक

ठळक मुद्देसंडे अँकर । लक्ष्मीदेवपेठा येथे करणार अहिंसक कृतीद्वारे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील लक्ष्मीदेवपेठा येथील ८५ महिलांनी गावातील दारूविक्री पूर्णत: बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून महिला अवैैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीदेवपेठा येथे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्या उपस्थितीत दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय महिलांनी यावेळी बोलून दाखविला होता. लक्ष्मीदेवपेठा येथे चोरून लपून दारूविक्री होत आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असते. महिलांना पतीकडून मारहाण होत असते. त्यामुळे येथील दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून विक्री थांबावी यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने विशेष सभा घेण्यात आली. या सभेला तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश शानागुडा, पोलीस पाटील मलुनेश आदे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्यासह गाव संघटनेच्या ८५ महिला उपस्थित होत्या. दारूमुळे होत असलेला शारीरिक व मानसिक त्रास महिलांनी यावेळी सांगितला. गावात शांतता नांदण्यासाठी चार दिवसात सर्वच विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून गावातील दारूविक्री कायमची बंद करण्याचे आश्वासन तंटामुक्ती अध्यक्षांनी दिले. महिलांच्या सदैव पाठीशी असून विक्रेत्यांची गय केली जाणार नसल्याने दराडे यावेळी म्हणाले. येत्या चार दिवसात दारूविक्री बंद न झाल्यास आक्रमक भूमिका घेत संपूर्ण गावात एकाच दिवशी अहिंसक कृती करणार असल्याचा निर्धार महिलांनी केला. गाव प्रशासन व महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

१५ दारूविक्रेते सक्रिय
लक्ष्मीदेवपेठा येथे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैैध दारूविक्री केली जात आहे. गावात १५ दारूविक्रेते सक्रीय आहेत. त्यामुळे परिसराच्या गावातीलही व्यसनी येथे दारू पिण्याकरिता येतात. गावातील अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. त्यामुळे येथील पंधरा अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा महिलांनी दिला आहे.

Web Title: Aggressive Women to Drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.