पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये... आदिवासींची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 13:28 IST2021-10-27T12:34:44+5:302021-10-27T13:28:09+5:30
सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये... आदिवासींची आर्त हाक
शताली शेडमाके
गडचिरोली : 'शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो अन् आमचं सर्वकाही या निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमचा निसर्ग आमच्यापासून उचलून, मोडून, तोडून जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने चोरुन घेऊन जाण्याचे कारस्थान काहींनी रचले जात आहे. आम्हाला मदत करा...' ही आर्त हाक आहे जिल्ह्यातील अनेक आदिवासींची जे गेल्या दोन दिवसांपासून सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाविरोधात पहाडाखाली जमले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. मागिल सहा वर्षांपासून या पहाडावरील हे उत्खनन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरजागडसह इतर खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील आदिवासी समुदाय प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सरकारने हे उत्खनन थांबवण्याऐवजी अतिरिक्त २५ खाणींना मंजुरी दिली असून ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासींनी एटापल्लीतील हेडरी नाक्यावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून यामुळे वातावरण तापले आहे.
पर्यावरणाचा जगभर र्हास सुरू असताना त्याचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. त्यात ज्या आदिवासींनी आजवर जंगल जपून ठेवत निसर्गाला जिवंत ठेवण्याचे काम केले आज त्यांच्याकडून त्याचं जंगल हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. एकवेळ तोडलेली झाडे लावता येतीलही पण चोरीला गेलेला डोंगर कसे बांधणार? असा उद्विग्न प्रश्न माडिया समुदायातील सामाजिक कार्यकर्ता ॲड. लालसू नोगोटी यांनी विचारला आहे.
आज आपण फक्त पाहत बसलो, शांत राहिलो तर पुढच्या ३० वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक वनराईअसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलं नष्ट होतील. पहाड उद्वस्त झाल्यानं झरे, नाले, नद्या कोरड्या पडतील. येथील जैवविविधता नष्ट होईल. जंगलाचा राजा असणारा आदिवासी गुलाम बनून जाईल. तेव्हा जंगल वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी आम्हाला आपली साथ द्या. आमची सोबत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, एटापल्ली तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात सरकारकडून लोहखनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. याला लोकांचा सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. तर आता सरकारने अतिरिक्त २५ खाणींना मजुरी दिली. ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शेकडो आदिवासी जमले असून खाणींविरोधातील सोमवारच्या विशाल मोर्चानंतर पद्देवाही फाट्याजवळ ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे.