मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

By Admin | Updated: June 25, 2015 01:54 IST2015-06-25T01:54:32+5:302015-06-25T01:54:32+5:30

२०११-१२ पासून राज्यात मॉडेल स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात होती.

475 students will be adjusted for model school | मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

रवी रामगुंडेवार एटापल्ली
२०११-१२ पासून राज्यात मॉडेल स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात होती. केंद्र शासनाने २०१५- १६ पासून ही योजना बंद केली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या पाच मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे २६ जून पूर्वी इतर शाळेत समायोजन केले जाणार आहे.
केंद्र शासनाने राज्यातील ४३ तालुक्यातील मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या युपीए सरकारने देशातील अतिमागास तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निर्देशांक उंचाविण्यासाठी मॉडेल स्कूल ही संकल्पना सुरू केली होती. या योजनेला केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात होते. मात्र १८ जून २०१५ ला गटशिक्षणाधिकारी, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक व पाचही तालुक्यातील खासगी अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन २६ जून पूर्वी या पाच शाळांतील ४७५ विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मॉडेल स्कूल अहेरी येथील ११९ विद्यार्थ्यांचे सेमी इंग्लिश माध्यमामध्ये राजे धर्मराव हायस्कूल अहेरी, राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली, राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली, मॉडेल हायस्कूल सिरोंचा येथील ११३ विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा, मॉडेल हायस्कूल एटापल्ली येथील ६८ विद्यार्थ्यांचे जि. प. हायस्कूल एटापल्ली, मॉडेल हायस्कूल भामरागड येथील ७६ विद्यार्थ्यांचे लोकबिरादरी हायस्कूल हेमलकसा व राजे धर्मराव हायस्कूल येथे सेमी इंग्रजी माध्यम सुरू झाल्यावर समायोजन केले जाणार आहे.
मॉडेल हायस्कूल धानोरा येथील ११९ विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा व जिल्हा परिषद हायस्कूल मोहली येथे सेमी इंग्रजी माध्यम सुरू केल्यानंतर समायोजन होणार आहे.

Web Title: 475 students will be adjusted for model school