६५ लाखांचे बक्षीस असलेले २६ जहाल माओवादी शरण; छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश
By संजय तिपाले | Updated: January 7, 2026 14:55 IST2026-01-07T14:54:00+5:302026-01-07T14:55:01+5:30
Gadchiroli : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या कंबरडे मोडणारी कामगिरी केली आहे.

26 Maoists with a bounty of Rs 65 lakh surrender; Police operation a big success in Chhattisgarh
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या कंबरडे मोडणारी कामगिरी केली आहे. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे आणि नक्षली विचारधारेतील पोकळपणाला कंटाळून ७ जानेवारी रोजी सकाळी २६ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, यात ६५ लाखांचे इनाम असलेल्या १३ जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून, या मोठ्या यशामुळे बस्तर विभागात नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
आत्मसमर्पण केलेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये ७ महिला कॅडर्सचा समावेश आहे. माओवादी कंपनीची समिती सदस्य लाली ऊर्फ मुचाकी आयते लखमू (३५) हिनेही शस्त्र खाली ठेवले. २०१७ मध्ये ओडिशातील कोरापूट रोडवर पोलिसांचे वाहन आयईडी स्फोट घडवून उडविले होते, यामागे लाली ही मास्टरमाईंड होती. यासोबत हेमला लखमा (४१), अस्मिता उर्फ कमलू सन्नी (२०), रामबती उर्फ पदम जोगी (२१), सुंदर पाले (२०) यांचाही समावेश आहे. हे सर्वजण गेल्या अनेक वर्षांपासून विविध हिंसक कारवायांमध्ये सक्रिय होते. मात्र, शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मुख्यालयी पोलिस अधीक्षकांसमोर त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारला.
मोठ्या हल्ल्यांचे धागेदोरे मिळणार?
एकाच वेळी २६ नक्षलवादी शरण आल्यामुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या नक्षली हल्ल्यांचे नियोजन आणि त्यातील सहभागी नेत्यांची माहिती यातून समोर येऊ शकते. या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर नक्षली चळवळीची ताकद मोठ्या प्रमाणावर क्षीण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
सुकमा पोलिसांकडून नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'पुना मारगेम' (नवी पहाट) ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले जाते. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवादी शरण येत असल्याचे बोलले जात आहे.
'नक्षलवादी विचारधारेतील अंतर्गत भेदभाव आणि हिंसाचाराला कंटाळून हे तरुण बाहेर पडत आहेत. आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येकाला शासनाच्या नियमानुसार सर्व सोयी-सुविधा आणि आर्थिक मदत दिली जाईल, जेणेकरून ते सन्मानाने नवीन आयुष्य सुरू करू शकतील.'
- किरण चव्हाण, पोलिस अधीक्षक, सुकमा