सिरोंचा व कुरखेडा तालुक्यात विजेच्या धक्क्याने १२ जनावरे ठार

By Admin | Updated: June 24, 2015 02:39 IST2015-06-24T02:39:12+5:302015-06-24T02:39:12+5:30

कुरखेडा तालुक्यातील घाटी व सिरोंचा तालुक्यातील राजन्नापल्ली येथे विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारांचा स्पर्श होऊन १२ जनावरे दगावल्याची घटना २१ जून रोजी घडली.

12 cattle killed in Sironcha and Kurkheda talukas | सिरोंचा व कुरखेडा तालुक्यात विजेच्या धक्क्याने १२ जनावरे ठार

सिरोंचा व कुरखेडा तालुक्यात विजेच्या धक्क्याने १२ जनावरे ठार

राजन्नापल्लीत १० जनावरांचा मृत्यू : १० लाख ३५ हजारांचे नुकसान
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील घाटी व सिरोंचा तालुक्यातील राजन्नापल्ली येथे विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारांचा स्पर्श होऊन १२ जनावरे दगावल्याची घटना २१ जून रोजी घडली.
सिरोंचा तालुक्यातील आरडा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या राजन्नापल्ली शेतशिवारामध्ये विद्युत तारा तुटून पडली होती. या शेतशिवारात चरणाऱ्या जनावरांना जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला व ९ म्हैस तसेच १ बैल जागीच ठार झाला.
पैकन लिंगय्या यांच्या दोन म्हैस, रंगू किष्टय्या यांच्या दोन म्हैस, मारगोनी सत्यनारायण, कंबाला किष्टय्या, येतम व्यंकटस्वामी यांची प्रत्येक एक म्हैस व बालय्या कुमरी यांचा एक बैल दगावला. तसेच म्हशींचे दोन रेडकूसुद्धा दगावले आहेत. यामुळे जवळपास १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व महावितरणचे कार्यकारी अभियंता कटकमवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. जनावर मालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य तथा नाविसचे तालुकाध्यक्ष बापन्ना रंगुवार यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने गाय व गोऱ्हा ठार झाल्याची घटना २१ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
घाटी येथील शेतकरी पितांबर ढवळे यांचा गोऱ्हा, रत्नघोष हुमणे यांची गाय सावजी बावणे यांच्या शेतात चरत असताना शेतातील मोटारपंपासाठी लावलेल्या विद्युत तारा अचानक तुटून खाली पडल्या व त्यांचा शॉक लागून गाय व गोऱ्हा जागीच ठार झाले. यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी सरपंच, पोलीस पाटील, तंमुस अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. महावितरण कंपनीने जनावर मालकांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ऐन खरीप हंगामात जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 12 cattle killed in Sironcha and Kurkheda talukas