ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:15 IST2026-04-21T15:14:16+5:302026-04-21T15:15:28+5:30
Anushka Sarkate Nikhil Chavan Engagement: 'वचन दिले तू मला' मालिकेतील ऊर्जाची नवी सुरुवात! 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा

ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा
Anushaka Sartke Engagement: मराठी कलाविश्वात अक्षया-हार्दिक जोशी तसेच तितिक्षा- सिध्दार्थ असे रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणारे अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटी कपलचं नाव जोडलं जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'वचन दिले तू मला' या मालिकेत ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच अनुष्काचा लोकप्रिय अभिनेता निखिल चव्हाणसोबत साखरपुडा पार पडला आहे.
प्रेक्षकांची लाडकी ऊर्जा आता खऱ्या आयुष्यात नवीन सुरुवात करणार आहे. अनुष्काचा नुकताच साखरपुडा झाला असून त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते देखील प्रचंड आनंदी झाले आहे. शिवाय आता निखिल-अनुष्काच्या लग्नाबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राजकीय नेते विनोद पाटील यांनी अनुष्का-निखिलच्या साखरपुड्याचा एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे त्यांच्या साखरपुड्याची बातमी सर्वत्र पसरली. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलंय, "आमची भाची अनुष्का सरकटेचा साखरपुडा लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल चव्हाण याच्यासोबत पार पडला. झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' मालिकेत ते एकत्र झळकले होते. हा सोहळा खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले. या जोडीला खूप प्रेम, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी 'कारभारी लयभारी' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. पडद्यावरील ही ऑनस्क्रिन जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. या साखरपुड्यासाठी अनुष्काने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसा लूक केलाय. तर निखिलने निळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केल्याची पाहायला मिळतेय. दरम्यान, अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.