nandur madhmeshwar wildlife sanctuary likely to be included in ramsar list | रामसरच्या यादीत समाविष्ट होणार राज्यातील पहिले अभयारण्य
रामसरच्या यादीत समाविष्ट होणार राज्यातील पहिले अभयारण्य

- अझहर शेख

नाशिक : सस्तन वन्यजीवांच्या आठ प्रजाती, २४ प्रकारचे मासे, २६५ पेक्षा अधिक स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचा हंगामी अधिवास, विविध पाणवनस्पती, झाडेझुडपांसह फुलपाखरांच्या ४१ प्रजातींमुळे निफाड तालुक्यातील चापडगाव क्षेत्रातील नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची वाटचाल ‘रामसर’च्या दिशेने सुरू आहे.

रामसरच्या यादीत भारतातील २६ पाणथळ जागांचा समावेश झाला आहे. स्वीत्झर्लंडमधील रामसर सचिवालयाकडे केंद्राकडून ‘नांदूर-मधमेश्वर’चा प्रस्ताव गेला आहे. तसे झाल्यास रामसरच्या यादीत समाविष्ट होणारे हे पाणथळ ठिकाण महाराष्ट्रातील एकमेव ठरेल. ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर’ असे गौरवोद्गार या अभयारण्य भेटीत काढले होते, असे येथील काही ज्येष्ठ पक्षीमित्र तथा वन्यजीव विभागाचे अधिकारी सांगतात. यावरून येथील जैवविविधता लक्षात येते.

या अभयारण्याचे जतन-संवर्धन करण्यासाठी नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्य क्षेत्र निश्चित केले जात आहे. यासाठी सीमांकनाचा प्रस्ताव वन्यजीव विभागाकडून तयार करण्यात आला. या प्रस्तावात राज्याच्या वन्यजीव मंडळाने काही सूचना केल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करीत सोमवारपर्यंत सीमांकनाचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव विभागाकडे पाठविला जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले.

‘रामसर’च्या ८८ प्रजाती नांदूर-मधमेश्वरला
नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजातींची येथे नोंद झाली आहे. रामसरमध्ये आढळणाऱ्या १४८ स्थलांतरित पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूर-मधमेश्वरमध्ये आढळून येतात.

5687 पक्ष्यांची नोंद
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील धरणे भरल्यामुळे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात होणारे आगमन लांबणीवर पडले आहे. ऑक्टोबरअखेरच्या प्रगणनेत हळदी-कुंकू बदक, थापट्या (नॉर्दन शॉवलर), जांभळी पाणकोंबडी, गढवाल, ग्रेट स्पॉटेड ईगल, मार्श हॅरियर, पाणकावळे, रंगीत करकोचा, ग्लॉसी आयबीस, उघड्या चोचीचा करकोचा, चमचा, पिनटेल, टफ्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, राखी बगळा, जांभळा बगळा, तुतवार, किंगफिशर, हुदहुद, ग्रीन बी-ईटर या पक्ष्यांनी नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्यात एन्ट्री केली आहे. गणनेदरम्यान अभयारण्यात एकूण ५ हजार ६८७ पक्षी आढळून आले.

फ्लेमिंगोची एन्ट्री : नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात यंदा परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले असले तरी फ्लेमिंगोने अभयारण्य क्षेत्रात नुकतीच एन्ट्री केली आहे. येथील पक्षीनिरीक्षकांना जलाशयावर पाच फ्लेमिंगो पक्षी आढळून आले आहेत. यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन तसे लवकरच झाले आहे. 

Web Title: nandur madhmeshwar wildlife sanctuary likely to be included in ramsar list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.