इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत; 'अशी' असेल शिक्षणपद्धती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 05:37 IST2023-07-12T05:36:48+5:302023-07-12T05:37:36+5:30
नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण : १५० पर्यायी विषय, वर्षातून दोनदा होणार परीक्षा

इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत; 'अशी' असेल शिक्षणपद्धती
नवी दिल्ली - इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत लागू करण्याचा निर्णय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क- एनसीएफद्वारे (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा) ठरविण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ते बारावी इयत्तेपर्यंत १५० पर्यायी विषयांची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना आपले विषय निवडायचे आहेत, तर वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे.
नववी, दहावीसाठी आठ स्ट्रीममधील किमान तीन समूहांतील चार विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. प्रत्येक विषयाचे चार-चार पेपर असतील. विद्यार्थ्यांना १५० विषयांच्या पर्यायांतून आपले विषय निवडायचे आहेत. आतापर्यंत अकरावी व बारावीच्या स्तरावर विज्ञान, वाणिज्य, कला अशा शाखांतील विषय असत. मात्र, आता वेगळी पद्धती अस्तित्वात येणार आहे. संगीत, खेळ, क्राफ्ट व व्होकेशनल एज्युकेशन या विषयांचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य शाखा विषय, भाषा, सामाजिक शास्त्र यांच्याबरोबरीनेच गणला जाणार आहे.
नवी पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यांत इयत्ता तिसरी, सहावी व नववीची नव्या पद्धतीची पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आठ स्ट्रीममधील विषय : इयत्ता नववी व दहावीमध्ये आठ स्ट्रीम असतील. त्यात मानव्य शाखा विषय, भाषा, गणित, व्होकेशनल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण, कला, समाजशास्त्र, विज्ञान, आंतरशाखीय विषय अशा आठ गटांतील विषय असतील. त्या प्रत्येक गटातील दोन असे १६ विषय विद्यार्थ्यांना निवडावे लागतील.
अशी असेल शिक्षणपद्धती
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सेमिस्टर पद्धतीने दिले जाईल. वर्षभरात बोर्डाची परीक्षा देण्याच्या दोन संधी देण्यात येतील. इयत्ता नववी, दहावी, बारावीमध्ये सुमारे १६-१६ पेपर्स (कोर्स) द्यावे लागतील. याचा अर्थ एका वर्षात कमीत कमी आठ विषयांचे पेपर द्यावे लागतील. इयत्ता नववीचा निकाल हा दहावीच्या अंतिम निकालाशी जोडलेला असेल. तसेच अकरावीमध्ये मिळालेले गुण बारावीच्या
निकालाशी जोडून त्यावर आधारित गुणपत्रिका मिळेल.
फाउंडेशन स्टेजमध्ये कोणतीही परीक्षा नाही
बालवाडी किंवा प्री-स्कूल स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जादूचा पेटारा (त्यात ५३ विविध प्रकारांचे खेळ, पोस्टर, खेळणी, बोर्ड, बिल्डिंग ब्लॉक, प्लेइंग कार्ड यांचा समावेश आहे) ही संकल्पना राबविली जाईल. या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागणार नाही. सहा ते आठ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळेल. या इयत्तेत फक्त भाषा व गणिताची पुस्तके असतील. दुसऱ्या इयत्तेनंतर फाउंडेशन लेव्हल पूर्ण होईल. फाउंडेशन लेव्हलमध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही.