एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:14 IST2025-09-26T06:13:22+5:302025-09-26T06:14:08+5:30
विविध क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
मुंबई : राज्यात मागील काही वर्षांपासून एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातून यंदा आतापर्यंतचे विक्रमी २२,५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर या अभ्यासक्रमाच्या ९५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत.
विविध क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. विधीच्या पदवीमुळे नोकरीत मिळू शकणारी बढती, तसेच वकिली व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा अनेकांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आकृष्ट करत आहे. त्यातून यंदाही या अभ्यासक्रमाच्या अनेक कॉलेजांतील जागा हाऊसफुल झाल्या आहेत. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी यंदा २१७ कॉलेजांमध्ये २३,७२९ जागा होत्या. यासाठी तब्बल ५३,९९० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यातील २२,५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
जागा वाढूनही प्रवेशाची स्पर्धा चढीच
यंदा एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये २,६५८ एवढी भरघोस वाढ झाली. मात्र तरीही प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने यंदाही तीव्र स्पर्धा होती. गेल्या वर्षी राज्यात विधी अभ्यासक्रमासाठी २१,०७१ जागा होत्या. यंदा त्या वाढून २३,७२९ एवढ्या झाल्या. मात्र जागांमध्ये वाढ होऊनही बहुतांश कॉलेजांतील सर्व जागांवर प्रवेश झाले. तर गेल्या पाच वर्षात एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये ५,३०४ एवढी मोठी वाढ झाली आहे.
एलएलबी पाच वर्षांसाठी १०,०२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश
पाच वर्ष एलएलबी अभ्यासक्रमासाठी यंदा १०,०२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या अभ्यासक्रमासाठी १३,५८९ जागा होत्या. त्यापैकी ३,५६३ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पाच वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी १२,७३१ जागा होत्या, त्यापैकी ९,४३८ जागा भरल्या होत्या.