मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:05 PM2023-10-18T15:05:29+5:302023-10-18T15:06:07+5:30

NEET Success Story: मुलीला अभ्यासात प्रेरणा मिळावी, यासाठी डॉक्टर पित्यानेही NEET ची परीक्षा दिली.

NEET Success Story: uttar-pradesh-doctor-father-gives-neet-exam-2023-to-inspire-daughter-both-qualified | मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

NEET Success Story: पालक आपल्या मुलांना यशस्वी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रेरित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा, म्हणजेच NEET UG 2023 ची तयारी करणाऱ्या मुलीसाठी डॉक्टर बापानेही NEET चा अभ्यास केला आणि तिच्यासोबत परीक्षा दिली. 

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मिताली खेतान, हिने आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर बनण्यासाठी NEET चा अभ्यास सुरू केला. मिताली रात्री अभ्यास करायची, त्यामुळे डॉ. प्रकाश खेतान यांनीही दिवसभर काम केल्यानंतर मुलीसोबत रात्री अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे, डॉ. खेतान यांनीही मुलीसोबत NEET ची परीक्षा दिली आणि त्यात पासही झाले.

कोटाच्या वातावरणाने घाबरवले
डॉ. प्रकाश खेतान सांगतात की, त्यांनी त्यांच्या मुलीला NEET ची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे पाठवले होते. पण, मागील काही दिवसांपासून तिथली परिस्थिती बिघडली होती. अनेक विद्यार्थी कोटामध्ये नैराश्येत येऊन आत्महत्या करू लागले. यामुळे डॉ. खेतान घाबरले आणि त्यांनी मुलीला परत बोलावून घेतले. 

मितालीने वडिलांपेक्षा जास्त गुण घेतले
मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी केली. दोघांना NEET UG 2023 साठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे मिळाली. जून महिन्यात परीक्षेचा निकाल आला, यात मितालीला 90 टक्क्यांहून अधिक तर डॉ. खेतान यांना 89 टक्के गुण मिळाले आहेत. यानंतर मितालीने कर्नाटकातील प्रसिद्ध कॉलेज कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला.

गिनीज बुकमध्ये नोंद 
डॉ. प्रकाश खेतान, हे प्रसिद्ध न्यूरो सर्जन आहेत. 1992 मध्ये सीपीएमटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर 1999 मध्ये लखनऊमधून एमएस सर्जरी आणि 2003 मध्ये एमसीएच न्यूरो सर्जरीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी अनेक अवघड ऑपरेशन्स केली आहेत. 13 एप्रिल 2011 रोजी त्यांनी 8 तासांच्या शस्त्रक्रियेत 18 वर्षांच्या मुलीच्या मेंदूतील 296 सिस्ट काढले. यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. 

Web Title: NEET Success Story: uttar-pradesh-doctor-father-gives-neet-exam-2023-to-inspire-daughter-both-qualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.