Education News: इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द शिकवा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:24 IST2021-11-26T17:23:50+5:302021-11-26T17:24:21+5:30
Education News: येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री Varsha Gaikwad यांनी दिले.

Education News: इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द शिकवा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना
मुंबई - राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अत्यावश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी भाषेची अडचण येऊ नये यासाठी इंग्रजीतील संकल्पना बालपणापासूनच स्पष्ट होण्याची आवश्यकता असते. यादृष्टीने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.
विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी आज प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर (ऑनलाईन) उपस्थित होते.
प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या 488 आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक आणि द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी या शाळांमध्ये दुसरीच्या वर्गामध्ये अशा अभ्यासक्रमांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन मराठी शब्दांच्या जोडीला समानार्थी आणि सोप्या इंग्रजी शब्द आणि वाक्यांचा वापर करण्यात यावा. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.