ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:45 IST2025-10-13T10:45:17+5:302025-10-13T10:45:44+5:30
अनेक बँकांच्या शाखांमध्ये पायाभूत सुविधा व पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने ‘चेक क्लिअरिंग’च्या नव्या योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे.

ज्या दिवशी बँकेत चेक भरला, त्याच दिवशी तो वटेल?
ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक
चेक (धनादेश) जलदरीत्या वटवून त्याची रक्कम एकाच दिवसात चेकधारकांच्या बँक खात्यांत काही तासांत जमा व्हावी, आर्थिक व्यवहारांना गती देता यावी, तसेच ‘डिजिटल इंडिया’ला प्रोत्साहन मिळावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर, २०२५ पासून चेक वटविण्यासंबंधीच्या प्रणालीमध्ये मोठा बदल केला; परंतु आवश्यक त्या पूर्वतयारीकरिता बँकांना पुरेसा वेळ न दिल्यामुळे देशात अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेक वटविण्यासाठी सध्या ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ म्हणजेच ‘सीटीएस’ ही प्रणाली वापरण्यात येते. चेक ड्रॉप बॉक्स अथवा ऑटोमेटेड टेलर मशीनमध्ये जमा केल्यानंतर तो वटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. यामुळे अनेकदा बँकेच्या ग्राहकांचे नुकसान होते. उदा. : एखाद्या व्यक्तीने त्याच्या ‘पीपीएफ’च्या खात्यात जमा करण्यासाठी दीड लाख रुपयांचा दुसऱ्या बँकेचा चेक ३ एप्रिल रोजी भरला. त्या धनादेशाची रक्कम पीपीएफच्या खात्यात ५ तारखेनंतर जमा झाल्यास त्या व्यक्तीला एप्रिलच्या संपूर्ण महिन्याचे व्याज मिळत नाही. त्यामुळे त्याचे ८८७.५० रुपयांचे नुकसान होते. चक्रवाढ व्याजाचा विचार करता, त्या व्यक्तीचे प्रत्यक्षात काही हजार रुपयांचे नुकसान होत असते. मोठे व्यापारी तसेच उद्योगांच्या बाबतीत तर हे आर्थिक नुकसान फारच मोठे असते.
दि. ४ ऑक्टोबर, २०२५ पासून ‘सीटीएस’ या प्रणालीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून तिचे रूपांतर ‘क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रिअलायझेशन’ म्हणजेच ‘आधी वसुली, नंतर पूर्तता’ यामध्ये केले आहे. आता चेक त्याच दिवशी वटेल व काही तासांतच चेकची रक्कम चेकधारकाच्या खात्यात जमा होईल. यासाठी रिझर्व्ह बँकेने पेमेंट सेटलमेंट नेटवर्क अद्ययावत केले आहे. सदरची प्रणाली सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व कोटक महिंद्र बँकेत लागू करण्यात आलेली असून, चेक बाउन्स होऊ नये म्हणून धनादेश देणाऱ्यांनी त्यांच्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवण्याचे तसेच चेकचा तपशील योग्यरीत्या भरण्याचे आवाहन सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांना केलेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’चा वापर ग्राहकांनी करावयाचा आहे. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताना धनादेश देणाऱ्याने त्यासंबंधीची पूर्वसूचना बँकेला द्यावयाची आहे. चेक मिळाल्यावर बँक त्या तपशिलाची तपासणी करील व सर्व तपशील जुळल्यानंतर त्या चेकची रक्कम संबंधित लाभार्थी खातेदाराच्या खात्यामध्ये जमा करील; परंतु सदरची पूर्वसूचना बँकेला दिली नाही तर बँक चेक वटवत नाही. अनेक बँका फोनवर अथवा एसएमएसद्वारे दिलेली पूर्वसूचना स्वीकारीत नाहीत. बँकेच्या ॲपवर अथवा बँकेत जाऊन त्यांचा फॉर्म भरूनच पूर्वसूचना द्यावी लागते. हे ग्राहकांच्या दृष्टीने खूपच गैरसोयीचे आहे.
चेक क्लिअरन्स प्रणाली कसे काम करील?
सकाळी १० ते सायंकाळी चारच्या दरम्यान जमा केलेले चेक ताबडतोब स्कॅन करून क्लिअरिंगसाठी पाठविले जातील. बँकांमध्ये सेटलमेंट सकाळी ११ पासून तासाभराने होईल. ज्या बँकेला रक्कम अदा करावयाची आहे, त्यांनी संध्याकाळी सातपर्यंत त्यासंबंधीची सकारात्मक अथवा नकारात्मक पुष्टी करावयाची आहे. ती न केल्यास चेक आपोआप वटेल.
या योजनेची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ पर्यंतचा असून, यात बँकांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चेकची पुष्टी करणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा ३ जानेवारीपासून सुरू होणार असून, त्यात बँकांना तीन तासांत चेकची पुष्टी करावी लागणार आहे.
अपुरे मनुष्यबळ, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाउन असणे व इतर तांत्रिक अडचणींमुळे चेक वटविण्यास सध्या विलंब होत आहे. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी चेक वटविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्कॅनरसारख्या पायाभूत सुविधाही नाहीत. बँकांच्या अनेक शाखांमध्ये कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून चेक स्कॅनिंग व अपलोड करण्याचे काम करीत आहेत. मुळात दररोज हजारो चेक वटविण्याची प्रक्रिया पार पाडणे हे अत्यंत जबाबदारीचे व जोखमीचे काम आहे. त्यामुळे या प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा व पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
kantilaltated@gmail.com