शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध का वाढतोय?

By नंदकिशोर पाटील | Updated: December 1, 2025 17:40 IST

राज्यात एखादा नवा महामार्ग होणार असेल, तर सर्वांत अगोदर त्याची भूमाफियांना खबर लागते. प्रस्तावित महामार्गाचे नकाशे, रेखांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या भागातील जमिनीचे सौदे झालेले असतात.

- नंदकिशोर पाटीलकाल-परवाचीच घटना. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या प्रस्तावित महामार्गाचा कथित नकाशा समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. नकाशाची कोणतीही खातरजमा न करता भूमाफियांच्या गाड्या गावोगावी धावू लागल्या. महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांना गाठून जमिनीचे सौदे ठरविण्याची चढाओढ सुरू झाली. अचानक गावात नवखे लोक व महागड्या गाड्यांची वर्दळ वाढल्याने सर्वांनाच कुतूहल निर्माण झाले. हे नेमके काय प्रकरण आहे? जे माळरान कालपर्यंत गुरेढोरांनाही उपयोगाचे नव्हते, त्या परिसरातील जमिनी अचानक लाखोंच्या बोलीत विकत घेण्यासाठी झालेली धामधूम पाहून संबंधित जमीन मालकही बुचकळ्यात पडले. अखेर ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली आणि सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झाला. प्रस्तावित मार्गाचा बनावट नकाशा तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यातून ही सर्व घाईगडबड सुरू झाली!

राज्यात एखादा नवा महामार्ग होणार असेल, तर सर्वांत अगोदर त्याची भूमाफियांना खबर लागते. प्रस्तावित महामार्गाचे नकाशे, रेखांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या भागातील जमिनीचे सौदे झालेले असतात. जमीन मालकांना याची कसलीही खबरबात नसते. लाखमोलाची जमीन ते कवडीमोल दराने विकून मोकळे होतात. समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, पुणे शहरालगतचा वळण रस्ता, या रस्ते प्रकल्पांत असेच घडले आहे. त्यामुळे शेतकरी आता सावध झाले आहेत. सरकारलादेखील ते जमिनी देण्यास तयार नाहीत.

राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, रेल्वे मार्ग आणि सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन होत असल्याने लागवड योग्य क्षेत्र कमी होत चालले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ पर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ९ लाख ९ हजार हेक्टर शेतीयोग्य जमीन होती. मात्र, २०२२/२३ पर्यंत हे क्षेत्र २ कोटी ६ लाख २६ हजार हेक्टरांवर आले. म्हणजेच, पाच वर्षांत राज्यातील सुमारे ३ लाख ८३ हजार हेक्टर शेतीयोग्य जमीन कमी झाली आहे. अडीच एकरांची मालकी असलेल्या एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सरासरी चार व्यक्ती गृहीत धरल्या तरी या पावणे चार लाख हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणामुळे राज्यातील सुमारे पावणे सात लाख लोक विस्थापित झाले आहेत. ही संख्या खूप मोठी आहे. लागवडीयोग्य क्षेत्रात होत असलेली घट आणि कृषी अर्थव्यवस्थेतील मनुष्यबळाचे विस्थापन ही खूप गंभीर समस्या आहे.

भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव हेही शेतकऱ्यांच्या विरोधामागील कारण आहे. सरकार अधिग्रहण करताना जमिनीचा ‘रेडीरेकनर’ दर आधार म्हणून वापरते. त्यावर कायद्यानुसार १०० टक्के ते १२५ टक्क्यांपर्यंत सोलॅटियम, व्याज आणि इतर तरतुदी जोडल्या जातात; पण प्रत्यक्ष बाजार भावाच्या तुलनेत हा दर अनेकदा कमीच ठरतो. जमिनीच्या भविष्यातील आर्थिक-सामाजिक मूल्यांच्या तुलनेतदेखील ही भरपाई अपुरी ठरते. समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनींचा बाजार भाव ३० ते ३५ लाख प्रतिहेक्टर असताना अधिग्रहणाचा दर त्याच्या अर्धाही नव्हता. शिवाय, सिंचन विहिरी, फळबागा, ठिबक सिंचन संच, वृक्ष आदी घटकांचे अत्यल्प मूल्यमापन केले गेले. भूसंपादनाचा मोबदला मिळण्यास महिनोन्महिने लागले; परंतु ज्यांचे वरपर्यंत लागेबांधे होते, त्यांच्या जमिनीचे योग्य मूल्यांकन आणि तत्काळ मोबदला मिळाला. काही भागांत शेतकऱ्यांना एकदा ‘विशेष बोनस’ देऊन सहमती मिळविण्याचा प्रयत्न केला गेला, तर काही ठिकाणी कोणत्याही संवादाशिवाय मोजणी केली गेली. हे अनुभव शेतकऱ्यांचा अविश्वास अधिक वाढवतात.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी सुमारे ८०० किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ८,००० ते ८,६०० हेक्टर जमीन आवश्यक असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारने जमीन अधिग्रहणासाठी तब्बल वीस हजार कोटींची तरतूद केली आहे, तरीही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलने करीत आहेत. प्रश्न केवळ मोबदल्याचा नाही, तर विस्थापित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा आहे. विशेषतः लघू आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी जमीन ही फक्त मालकीचा एक भूखंड नसते, तर ती त्यांच्या उत्पन्नाचा, सुरक्षिततेचा आणि कुटुंबाचा आधार असते. शिवाय, मंदिरे, स्मशानभूमी, गोठे, गायरान आदींचे सांस्कृतिक-सामुदायिक नुकसान होते ते वेगळेच. वेगवान महामार्गांचे जेवढे फायदे उद्योग, वाहतूक आणि शहरांना मिळतात; त्या तुलनेत जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला खूपच तुटपुंजा ठरतो. त्यामुळे कुठल्याही विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बाजार भाव आणि त्यावर एकसमान अधिमूल्य देण्याचे धोरण आखले तरच विकासाचा मार्ग वेगवान होऊ शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers resist land acquisition due to unfair compensation, displacement concerns.

Web Summary : Farmers resist land acquisition for projects like highways due to inadequate compensation based on ready reckoner rates, displacement, and lack of transparency. They demand fair market value and worry about losing livelihoods and cultural sites, hindering project progress.
टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्र