- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)कंगना रनौत प्रकरण ज्या प्रकारे तापले आणि तापवले गेले ते पाहून हैराणच व्हावे अशी स्थिती आहे. जिच्या अर्थशून्य, उनाड विधानांमुळे रण माजावे एवढी ती महत्त्वाची सामाजिक किंवा राजकीय सेलिब्रिटी आहे काय? मुंबई पोलीस आणि पाकव्याप्त काश्मीरसंबंधी ती जे बोलली, ते मलाही आवडले नाही, पण म्हणून तिच्या विधानांना इतकी हवा देणेही गरजेचे नव्हते. कंगना रनौत ही एक सिनेमातील नायिका आहे; पण तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या राजकारणाने मात्र तिला विनाकारण ‘हिरो’ करून टाकले.बाळासाहेबांचे निवासस्थान ‘मातोश्री’बद्दल साऱ्या मुंबईत प्रेम, आदराची भावना आहे तशीच भीतीही आहे. आणि कंगनाच्या भाषेत बोलायचे तर त्या गर्वाच्या कंगनाने ठिक-या उडवल्या. मला दक्षिणेतील सिने अभिनेत्यांची आठवण झाली, जिथे एमजीआर, एनटीआर, करुणानिधी आणि जयललिता हे अभिनेते राजकीय हिरो झाले. कंगनाचे वैशिष्ट्य असे की बॉलिवूडमधल्या लोकांच्या स्टारडम पुढे ती झुकली नाही. न घाबरता, तडजोड न करता लढत राहिली. तिच्यात निर्भय वृत्ती आणि उत्साह आहे. जिथून रोजीरोटी मिळते, मानसन्मान मिळतो तिथल्यांशी संघर्ष करण्याची हिंमत तिने दाखवली. ‘उद्या माझे काय होईल’ याचा विचार न करता कंगना मुंबईच्या पुरुषप्रधान सिनेउद्योगाशी लढते आहे. बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या नायक-नायिकांना अनेक प्रकारचे ‘समझोते’ करताना मी पहिले आहे. कंगना मात्र इंचभर मागे हटायला तयार नाही. आपल्या अटींवर ती काम घेते आणि निभावते. लोकमत पत्रसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘मला भीती वाटत नाही. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मला काम मिळेलच!’- या हिमालायाच्या कन्येशी दोन हात करायला जाणे उचित नव्हते, हेच खरे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला होता; पण तोवर पुष्कळ पाणी वाहून गेले होते.‘मुंबईत येऊन दाखव’ अशी धमकी कंगनाला दिली गेली. त्यावर उडालेल्या शब्दांच्या फुलबाज्यांनी कोरोनाकाळात लोकांचे मनोरंजन केले. कंगनाने मुंबईत लवकर परतण्याचा निर्णय घेतला. तशी द्वाही फिरवली. ज्या प्रकारे ती मुंबईत उतरली, विमानतळावरून बाहेर पडली त्यावेळचा तिचा रुबाब विलक्षणच होता. जणू एखादे सिनेमातले दृश्यच! कमांडोंच्या घेºयात महाराणीसारखी पावले टाकत ती आपल्या गाडीकडे गेली. कोणताही तणाव नाही, भीती नाही. घरी पोहोचली तर कार्यालयाचा काही भाग तुटलेला दिसला. मग कंगनाने पुन्हा तोंड उघडले आणि काश्मिरी पंडितांचा मुद्दा मांडला. ‘शिवसेना विरोधाचे प्रतीक’ म्हणून तिने स्वत:ची एक नवीच प्रतिमा उभी केली आहे, हे निश्चित!
कंगनाला ‘हिरो’ करण्याची काय गरज होती? मुंबईला ‘पीओके’ म्हणणे निंद्यच; पण...
By विजय दर्डा | Updated: September 14, 2020 05:59 IST