कोण कुठले मित्रपक्ष? - सबकुछ मेराईच!’ दुखावलेल्या मित्रपक्षांनी भाजपचे उमेदवार पडण्याइतकी ताकद ठेवली...
By यदू जोशी | Updated: December 27, 2025 07:30 IST2025-12-27T07:28:54+5:302025-12-27T07:30:35+5:30
नगरपरिषद निवडणुकांचे धडे, सगळ्यांसाठीच थोडेथोडे आहेत ! भाजपच्या विजयात ‘काळजीची कारणे’ लपली आहेत, तर इतरांच्या दयनीयतेत ‘संधी’!

कोण कुठले मित्रपक्ष? - सबकुछ मेराईच!’ दुखावलेल्या मित्रपक्षांनी भाजपचे उमेदवार पडण्याइतकी ताकद ठेवली...
-यदु जोशी,
राजकीय संपादक, लोकमत
नगरपरिषद निवडणुकीत भाजप क्रमांक एकवर राहिला हे निर्विवाद, पण काही ठिकाणच्या पराभवापासून पक्षाने बोध घेतला नाही, तर पुढेही त्याचे फटके बसत राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व, त्यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलेली मेहनत याचा परिपाक म्हणजे परवाचा विजय. कोणत्याही एका पक्षाला ४८ टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळाल्या, असे आधी कधीही झालेले नव्हते, भाजपने ते करून दाखविले. पण, विजयाच्या कैफात काही ठिकाणच्या पराभवाची कारणे शोधण्याचा विसरही पडता कामा नये. चंद्रपूरमध्ये नामुष्की ओढवली. नंदुरबारमध्ये भोपळाही फोडता आला नाही. अमरावतीत गेल्यावेळपेक्षा नगरसेवक अन् नगराध्यक्षही कमी झाले. गोंदियात निराशा झाली. सोलापूरने भाजपसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘नगराध्यक्ष आपलाच पाहिजे, त्याला घरगड्यासारखे वापरता आले पाहिजे’ या अट्टाहासातून काही ठिकाणी लादलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार मतदारांनी नाकारले. सत्तरीत असलेल्या आमदार, माजी खासदारांनी नीट चालताही न येणाऱ्या आपल्या पत्नीला तिकीट दिले, त्या सपाटून आपटल्या. शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार)ला युतीसाठी बऱ्याच भाजप आमदारांनी साधे विचारलेही नाही, त्यातून दुखावलेल्या मित्रपक्षांनी भाजपचे उमेदवार पडण्याइतकी मते घेतली. ‘माझ्या शहरात मी मित्रपक्षांना मोजणार नाही, सबकुछ मेराईच!’ या उद्दामपणाने काही भाजप नेते, आमदारांनी नुकसान करून घेतले.
विदर्भात भाजपच अव्वल आहे, पण तेथे काँग्रेसच्या यशात भाजपसाठी भविष्यातील धोके लपले आहेत. नगरपरिषदांमध्ये अनेक ठिकाणी भाजपच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये शिंदेसेना आणि अन्य काही उमेदवारांनी मोठे विभाजन केले, त्याचा फायदा काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना झाला. बाहेरून आलेल्यांमुळे भाजपचे मूळ कॅडर फारच अस्वस्थ झाले आहे. नाशिकमध्ये आधी आ. सीमा हिरे, तर आता आ. देवयानी फरांदे बाहेरच्यांना घेण्यावरून संतापल्या आहेत. निवडणूक जवळ येईल, तशी अन्य भागातही अस्वस्थतेचे पडसाद उमटतील.
ठाकरे अन् मुंबईशी नाळ
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची अवस्था निकालात दयनीय झाली. नगराध्यक्षांचा दहाचा आकडाही गाठता आला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रापासून तुटल्याचे निकालाची आकडेवारी सांगते. स्वत:ला मुंबईपुरते मर्यादित करून घेताना एक मोठा धोका लक्षात आलेला नसावा. सर्वदूर महाराष्ट्रातून आलेला मराठी माणूस मुंबईत राहतो, त्यांची नाळ मुंबईशी जुळलेली आहे. या माणसांच्या गावांकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष दमदारपणे, झोकून देऊन लढला नाही, तर त्याचे परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसतील. गेल्या एक-दोन वर्षांत उद्धवसेना सोडून सर्वाधिक लोक भाजप वा शिंदेसेनेत गेले. मुले पळविणाऱ्या टोळ्यांची उपमा राज ठाकरेंनी त्यांना दिली आहे, पण जन्मदात्याला सोडून मुलांना का जावेसे वाटते, याचे आत्मचिंतनही गरजेचे आहे.
राष्ट्रवादीत हे काय चालले आहे?
पवारांची राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे बोट धरून पुढे चालेल असे दिसते. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांच्या एकत्र येण्याची जोरदार तयारी हे त्या दिशेचे पहिले पाऊल. आपल्यासोबत राहिलेल्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे असेल, तर अजितदादांसोबत जाण्याशिवाय राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार)कडे पर्याय दिसत नाही.
प्रश्न एकच आहे - सत्तेमध्ये सोबत असलेले अजित पवार यांचे महापालिका निवडणुकीत काकांसोबत जाणे भाजपला मान्य आहे असे दिसते. काका-पुतण्याच्या ऐक्याची स्क्रिप्ट आधीच लिहून ठेवलेली आहे असा त्याचा अर्थ निघू शकेल. दोन पवार एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शिंदेंची गाडी जोरात
नगरपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना कशी ताकद दिली, याचे किस्से आता चर्चिले जात आहेत. भाजपसह कोण्याही पक्षाने आपापल्या उमेदवारांना दिली नाही त्याच्या दुप्पटतिप्पट मदत शिंदे करतात म्हणे! पण केवळ तेवढ्यावर शिंदे निवडणूक जिंकतात, असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. शिंदेंना भेटायला प्रचंड गर्दी असते, म्हणून लोक ताटकळतात, पण भेटायला दुसरे कोणीही नसले तरी लोक ताटकळत बसले आहेत, साहेब आपल्याला कधी बोलावतील याची वाट पाहत बसले आहेत, असे त्यांच्याकडे होत नाही, फरक हाच आहे.
जाता जाता : ते आठ-नऊ वर्षे पुण्यात घरोघरी वृत्तपत्र वाटायचे. दहा बाय बाराच्या खोलीत आई, वडील, एकूण तीन भाऊ असे एकत्र राहायचे. माध्यमिक शाळेत असताना त्यांचे वडील गेले. आई लोकांच्या घरी स्वयंपाक करायला अनवाणी जायची. शाळेचे दप्तर घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नसायचे. आईवडिलांनी त्यांच्यात स्वाभिमान, संस्कार आणि चारित्र्याची पेरणी केली. पुढे हा मुलगा आयपीएस झाला, ते म्हणजे सदानंद दाते. निष्कलंक चारित्र्याचे दाते महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होत आहेत. पोलीस विभाग त्यांच्यासारखाच होईल का?
yadu.joshi@lokmat.com