काय (काय) लपलेलं असतं शहरांच्या पोटात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 04:47 IST2026-01-06T04:46:59+5:302026-01-06T04:47:24+5:30
माणसांना वेड लावणारी ऊर्जा आणि बकालीकरण या पेचात अडकलेली शहरं काय देतात, काय हिरावतात?- याचा शोध घेणारी पाक्षिक लेखमाला

काय (काय) लपलेलं असतं शहरांच्या पोटात?
मेघना भुस्कुटे, ब्लॉगर, भाषांतरकार, संपादक
शहरं मोहक असतात. अहं, तुम्हाला वाटतंय तसा हा शहर विरुद्ध गाव असा नेहमीचाच वादंग नाही. गावंही त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं लाघवी असतातच. पण शहरांमध्ये भूल घालण्याची, वेड लावण्याची, मोहात पाडण्याची कसलीशी अजब ताकद असते हेही खरं. हे आजचं नाही, युगानुयुगे मिरवत आली आहेत शहरं ही जादू. पण त्याबरोबरीनं गावांकडून वाट्याला आलेली तुच्छताही.
‘स्नान केलेल्या माणसाला पारोश्या माणसांकडे बघून वाटतं, तसं मला नगरजनांकडे बघून वाटतं. हे नगर अपवित्र आहे.’ असं खुद्द कालिदासाचंच एक पात्र ’शाकुंतला’त म्हणून गेलंय, म्हणजे बघा! तरीही शहरांची बिलोरी जादू अभंग आहे. आंबेडकर तर ’शहरांकडे चला’ असं म्हणून गेले आहेतच, पण भारतात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी जेमतेम दहा टक्के असलेली शहरी लोकसंख्या येत्या पाचेक वर्षांतच चाळीस टक्क्यांचा टप्पा गाठेल, असं आकडेवारी सांगते आहे. बॉलिवूडनंही अनेक वर्षं ‘शहर की लडकीयों’बद्दल अविश्वास आणि संशय मनात बाळगलाच की.
पण हळूहळू तिथूनही ‘गाँव की छोरी’ अदृश्य झालीय. तिथले नायक-नायिकाही ‘छोटे छोटे शहरों से…’ असू लागले आहेत. म्हणून म्हणतेय, शहरं मोहक असतात.
का? काय असतं त्यांच्या पोटात? ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ या कुसुमाग्रजांच्या ओळींतल्यासारखा झगमगाट? की शिक्षणाच्या नि रोजीरोटीच्या संधींची रेलचेल? कष्टकरी हातांना केवळ एका वडापावाची हमी? की खरंच आंबेडकरांना वाटत होतं, तशी समता? की रानाच्या आदिम भीतीपासून सुटकेचं आश्वासन? की गर्दीतला कुणी एक बिनचेहऱ्याचा मानवप्राणी होऊन आपापलं एकांडं जगण्याचं - आधुनिक स्वातंत्र्य? काय की बुवा. प्रत्येका(की)ची उत्तरं वेगळाली असतील.
या सगळ्यातला स्वप्नाळू भाव कुणाला पटणारही नाही कदाचित. शहरातल्या बकालीला नि ऊर्जेच्या उधळपट्टीला, आवाजाला आणि प्रदूषणाला, गर्दीला आणि वेगाला, मग्रुरीला आणि माजाला नावं ठेवणारे लोक आजही असतील. पोटापाण्याच्या मजबुरीपायी शहरात दिवस काढताना आपलं गाव आठवत झुरत असतील, ‘बहुत मीठा है पानी उस कुंंवे का, बडी मीठी है उन पेडों की छाँव…’ मनोमन आळवत असतील.
पण हेही तितकं खरं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या द्वैतापासून आपण आज पुष्कळ पुढे आलो आहोत. शहरांना पर्याय नाही, हे आपण आपलंसं केलं आहे. शहरीकरणाला अभूतपूर्व वेग आला आहे. शहरं हीच ज्यांची जन्मगावं आहेत, असा वर्ग आता बहुसंख्याक आहे.
‘शहर’ या संकल्पनेबद्दल अनेक पिढ्यांनी जोपासलेलं रागा-प्रेमाचं परस्परविरोधी रसायन त्यांना माहीत नाही. त्यांनी शहरी जगण्याखेरीज इतर काही पाहिलेलंच नाही. त्यांच्याकरताही शहरं तितकीच मोहक आहेत का? शहरांचं शहरपण असतं तरी कशात? ते निव्वळ भौतिक श्रीमंतीत असतं की त्यात नागरिकांच्या वागण्या-बोलण्याचा काही भाग असतो? असेल, तर तो नक्की कुठे असतो, कसा दिसतो? तो आजच्या शहरांमध्ये उरला आहे का? किती? नसेल, तर का नाही? वेगानं बदलत ‘शहरी’ होत चाललेल्या तुमच्या-आमच्या भोवतालात काय भलं आहे आणि काय बुरं आहे? कशानं जीव सुखावतो आहे? आणि कशानं खंतावतो आहे - व्याकुळतो आहे?
अशा तुम्हां-आम्हांला रोज पडणाऱ्या आणि आपण मनातच ठेवलेल्या प्रश्नांचं हे सदर. भेटूच.
meghana.bhuskute@gmail.com