आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं, पोरांना मराठी येत नाही!-हिशेब तिथेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 04:54 IST2026-03-24T04:54:22+5:302026-03-24T04:54:22+5:30

आपल्या बबड्याला खाडखाड इंग्रजी यायलाच पाह्यजे, या आकांक्षेने पछाडलेल्यांची भूक ओळखलेल्यांनी गावाेगावी इंग्रजी स्कूलं उभी केली.

we did not understand English the boys do not know marathi the account is there | आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं, पोरांना मराठी येत नाही!-हिशेब तिथेच!

आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं, पोरांना मराठी येत नाही!-हिशेब तिथेच!

बालाजी सुतार, कवी-कथाकार

एका आडवळणी गावाला जायचं म्हणून मोटारसायकल हाकत होतो. एकेरी सडक. मधूनमधून लागणारी बारकी गावं. एकेठिकाणी सडकेलगत ‘न्यू ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल’ अशी भरदार अक्षरं असलेली पाटी दिसली. शंभरेक पावलांवर, चहूबाजूंनी पत्रे मारलेले आणि छतही पत्र्याचंच अशा चार-सहा वर्गखोल्यांची शाळा. समोर वीतभर अंगण. त्यात रोवलेली ध्वजविरहित उंच काठी. आसमंतात सगळीकडे पसरलेली रुक्षकोरडी उन्हेरी मराठवाडी छटा... न्यू ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल! नाव वाचून आश्चर्य वाटलं नाही.  मागच्या दीड-दोन दशकांपासून असल्या शाळा गावागावात दिसायला
लागल्या आहेत.
 
या शाळा बघताना मला गावातली आमची शाळा आठवते. उतरतं छत असलेली मोठी आयताकृती शाळा. दोन-तीन खोल्या ऑफिस, स्टाफरूम वगैरेत गुंतलेल्या आणि बाकीच्यांतून भरणारे वर्ग. चौकोनाच्या मधल्या मोठ्या रिकाम्या जागेत काही झाडं. एक फार प्राचीन चाफ्याचं, एक तुतीचं. त्याला आमच्या गावात सैतुलाचं झाड म्हणत. एक-दोन झाडं तर डाळिंबाची. पावसाळ्यात या झाडांच्या बुंध्याखाली चहाच्या रंगाचं पाणी दिसे आणि एरवी कोणत्याही दिवसात त्या हिरव्या पानांत पाखरं चिवचिवत असत. 

धोतर-सदरा-टोपी अशा पेहरावातले, खेडवळ दिसले तरी चांगलंच शिकवणारे आमचे गुरुजीलोक. इंग्रजी आणि गणित हे  विषय पोरांना अवघड जात, पण ते सर्व संबंधितांनी गृहीतच धरलेलं. दहावीच्या परीक्षेत बहुसंख्य पोरं या दोन विषयांत आपटी खात. गणितं निदान सूत्रं कळायला लागल्यावर जमायची. इंग्रजीबद्दल असं नव्हतं. ती भाषा गावात ना कुठे कानी पडायची, ना दिसायची, त्यामुळे तिच्याशी मैत्री अशक्य आणि शत्रूभाव जास्त असे.  

असंख्य पोरं दहावीच्या परीक्षेत इंग्रजीत नापास होऊन शाळेला रामराम ठोकायची आणि जमेल त्या कामधंद्याला लागायची. इंग्रजीची भयंकर धास्ती खाल्लेली हीच आमची पिढी आता मजबूत फिया भरून आपल्या पोरांना गावगन्ना उगवलेल्या या ‘न्यू ऑक्सफर्ड’ स्कूलांमध्ये पाठवते. 

‘इंग्रजी येत नसल्यामुळे आपलं काहीच नीट झालं नाही’ असा खोल गंड मनात कायम बाळगून असलेल्या आम्हा बापांमुळे इंग्रजी शाळांच्या बाजारपेठांना कमालीची तेजी आलेली आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे मराठी शाळा क्रमश: बंद पडणं. त्यात सरकारी अनास्थेचा भाग मोठा आहेच, पण आपल्या बबड्याला खाडखाड इंग्रजी यायलाच पाह्यजे, या आकांक्षेने पछाडलेल्या लोकांचाही यात सिंहाचा वाटा आहे. लोकांची ही भूक ओळखलेल्या व्यापाऱ्यांनी आणि अनेक नेते-पुढाऱ्यांनी मग गावागावातून इंग्रजी स्कूलं उभी करून मजबूत पैसा छापायला सुरुवात केली.

दोनेक दशकांचा काळ सरला आहे. युनिफॉर्म घातलेली, खिशाला शाळेच्या नावाचा इंग्रजी बिल्ला लावलेली आणि टायबंद असलेली कथितपणे स्मार्ट दिसणारी मुलं आता घरोघर दिसतात. एकदा बाहेरून कुठून तरी घराकडे आलो, तर गल्लीत बरीचशी माणसं स्तब्धपणे उभी असलेली दिसली. कुणाचंसं निधन झालेलं होतं. शेजारचा एक इंग्रजी शाळेत जाणारा मुलगा दिसला, त्याला विचारलं, कोण गेलं? दोनपाच सेकंद विचार करत तो म्हणाला, ‘ते तिकडं खडं दिसतंय नं, त्याचे चुलत वडील ऑफ झालेत.’ 
‘चुलत वडील’ हे नातं लक्षात यायला मला मिनिटभर वेळ लागला. चुलत्याला मराठीत नेमकं काय म्हणतात हे त्या इंग्रजी शाळेतल्या मुलाला माहीत नव्हतं.

आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं. आमच्या पोरांना मराठी कळत नाही. म्हणजे एकूणात हिशेब जिथल्या तिथेच आहे.
    majhegaane@gmail.com
 

Web Title : हमें अंग्रेजी नहीं आती थी; बच्चों को मराठी नहीं: हिसाब बराबर!

Web Summary : पीढ़ियाँ भाषा से जूझ रही हैं। माता-पिता, अपनी अंग्रेजी की कमियों से डरते हुए, बच्चों को अंग्रेजी स्कूलों में धकेलते हैं, मराठी की उपेक्षा करते हैं। बच्चे अपनी जड़ों से दूर हो जाते हैं, जिससे भाषाई समीकरण अपरिवर्तित रहता है।

Web Title : English eluded us; Marathi escapes kids: accounts stay the same!

Web Summary : Generations struggle with language. Parents, fearing their own English shortcomings, push children to English schools, neglecting Marathi. Kids lose touch with their roots, leaving the linguistic equation unchanged.