शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल!

By admin | Updated: January 18, 2016 00:10 IST

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे जणू एक साहित्यिक होल्डॉलच आहे! शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल ! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या सारस्वताने मराठी साहित्य विश्वाच्या आणि ते साहित्य विश्व ज्याच्या मुशीतून साकारते त्या मराठी जीवनव्यवहाराच्या विविध अंगांना स्पर्श करावा, अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. माननीय सबनीस यांनी ही अपेक्षा प्रचंड गांभीर्याने शब्दश: मनावर घेतलेली दिसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शेतमालाचे हमीभाव, बहुसांस्कृतिकता, ‘सेक्युलॅरिझम’, राष्ट्रवाद, असहिष्णुता इथपासून ते गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ भिजत पडलेल्या सीमा प्रश्नापर्यंत सबनीस महाशयांनी सगळ्यांनाच वेठीला धरलेले आहे. साहित्याच्या प्रांतातही ‘सेक्युलर’ वाङ्मयीन प्रवाहापासून ते विद्रोही, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, ग्रामीण, गांधीवादी, मार्क्सवादी, विनोदी, भटक्या-विमुक्तांचे साहित्य, स्त्रीसाहित्य, बालसाहित्य, पर्यावरणवादी, कोशवाङ्मय ते ‘चारोळ्यां’पर्यंतच्या यच्चयावत साहित्य प्रवाहांना अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात हजेरी लावणे भाग पाडले आहे. या औरसचौरस पसाऱ्यापायी सबनीस यांच्या विवेचनास कोठेही कोणत्याही एकात्म सूत्राचा मागमूस लागत नाही. त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांवर जाता जाता केलेली शेरेबाजीवजा टिप्पण्णी, असेच सबनीस यांच्या मनोगताचे स्वरूप आहे. परिणामी, पसारा भरपूर दिसला तरी खोलीचा ठणठणाटच प्रकर्षाने जाणवतो. मराठी साहित्यातील विविध दालनांबद्दल अध्यक्ष महोदयांना काही ना काही म्हणायचे आहे, एवढाच बोध हे बाड नजरेखालून घातल्यानंतर होतो. मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक अशी प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांची ओळख असली तरी त्यांच्यातला समीक्षक त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रगटलेला जाणवत नाही. त्या त्या साहित्य प्रकारातील प्रचलित ढोबळ प्रवाह आणि साहित्याच्या त्या प्रांतात गाजणाऱ्या साहित्यकारांचे मोजके व निवडक नामनिर्देश यांचाच काय तो निर्देश सबनीस यांच्या टिप्पण्णीत असल्याने वाङ्मयेतिहासाच्या खंडांतील काही पाने आपण वाचतो आहोत की काय, असा भास वारंवार होत राहतो. चमकदार परंतु प्रत्यक्षात ठोस अर्थनिष्पत्ती न होणाऱ्या वाक्यांची ठायी ठायी पखरण हे सबनीस यांच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यातही शब्दांच्या अनावर हव्यासापायी अध्यक्षांची गाडी काही ठिकाणी औचित्याच्या आणि अभिरुचीच्या जोडरुळांवरून घसरताना दिसते. ‘शोषणमुक्त पत्रकारिता आणि लोकशाहीचे भवितव्य’ या मथळ्याखाली अध्यक्ष महाशयांनी वृत्तपत्र व्यवसायातील पत्रकर्मींच्या साहित्यनिर्मितीतील योगदानाचा ऊहापोह केलेला आहे. प्रादेशिक पत्रकारांच्या प्रातिभ शब्दाविष्काराने मराठी भाषा व वाङ्मयीन व्यवहाराला केलेल्या मूल्यात्मक योगदानाचा यथोचित निर्देश केल्यानंतर पुढे सबनीस यांनी जे एक वाक्य घातलेले आहे, ते आधीच्या विवेचनाची चव पूर्णपणे घालवणारे असेच आहे. ‘‘परंतु काही संपादक सुपारी घेऊन अजिंडा ठरवितात. ही पत्रकारिता चौथ्या स्तंभाला शोभणारी की लोकशाहीच्या तिरडीच्या दांडीला शोभणारी? याचा विचार करणे आवश्यक’’, या वाक्यातील सबनीस यांची उद्विग्नता समजण्याजोगी असली तरी तिचा भडक आविष्कार मात्र समर्थनीय अजिबातच नाही. वृत्तपत्रांचे मालक आणि वृत्तपत्रात काम करणारे संपादकासह यच्चयावत पत्रकर्मी यांच्या संबंधांमध्ये अलीकडील काळात घडून आलेल्या गुणात्मक बदलांबाबत मतप्रदर्शन करणारे सबनीस यांचे विधान तर कमालीचे भोंगळ आहे. ‘‘भारतातील मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याच्या साक्षी आहेत. निदान त्या संतत्वाला तरी काळजात व व्यवहारात स्थान मिळावे. म्हणजे पत्रकारांपासून कामगार-मजुरांपर्यंतचे सर्व शोषित सर्वार्थाच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतील’’, या सबनीस यांच्या शब्दबंबाळ मल्लीनाथीची अर्थनिष्पत्ती काय? भारतातल्या कोणत्या भागातील कोणती मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याचे साक्षीदार बनण्याचे अहोभाग्य सबनीस यांना लाभले हे त्यांचे तेच जाणोत ! मराठी शाळांच्या आजच्या दुरवस्थेचे उत्तरदायित्व सरकारच्या गळ्यात बांधताना, ‘‘मराठी शाळांची गळती व अवहेलना शासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा मराठी माणसाच्या नव्या पिढ्यांचे सांस्कृतिक पाप महाराष्ट्र शासनाच्या कपाळावर कोरले जाईल’’, अशी सबनीस यांनी उच्चारलेली भविष्यवाणी सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडणारी आहे. आजच्या मराठी पिढ्या आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणारच नसतील, तर साहित्य संमेलनांसारख्या उत्सवांचे प्रयोजनच मुदलात काय, असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. या प्रश्नांचे उत्तर सबनीस यांनी द्यावे अशी अपेक्षा नाही कारण ते माहीत असते तर या उत्सवाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी आजवर इतका आटापिटा केलाच नसता !