आजचा अग्रलेख : इम्रान खान अन् अल-कादिर ट्रस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:55 PM2023-11-29T12:55:40+5:302023-11-29T13:01:25+5:30

Imran Khan: वन-डे विश्वचषकाचे कवित्त्व जगभर सुरू असताना आणि साखळी सामन्यांतच अपमानास्पदरीत्या बाहेर पडाव्या लागलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फेरबांधणी सुरू असताना, तीस वर्षांपूर्वी हा चषक अभिमानाने उंचावणारा पाक कर्णधार, सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान विस्मृतीत गेलेले नाहीत. पाकिस्तानात खूप काही घडते आहे.

Today's Editorial: Imran Khan and Al-Qadir Trust | आजचा अग्रलेख : इम्रान खान अन् अल-कादिर ट्रस्ट

आजचा अग्रलेख : इम्रान खान अन् अल-कादिर ट्रस्ट

वन-डे विश्वचषकाचे कवित्त्व जगभर सुरू असताना आणि साखळी सामन्यांतच अपमानास्पदरीत्या बाहेर पडाव्या लागलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फेरबांधणी सुरू असताना, तीस वर्षांपूर्वी हा चषक अभिमानाने उंचावणारा पाक कर्णधार, सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान विस्मृतीत गेलेले नाहीत. पाकिस्तानात खूप काही घडते आहे. सार्वत्रिक निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. इम्रान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष त्यांच्या अटकेवरून सहानुभूती मिळविण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी असावी, असा अर्ज पीटीआयने निवडणूक आयोगाकडे करताना इम्रान यांच्यावरील गुन्हेगारी खटले ही राजकीय सूडबुद्धी असल्याचा दावा केला. आयोगाने तसे मानण्यास नकार दिला.

दरम्यान, गेल्या ऑगस्टमध्ये नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करून निवडणुकीचा मार्ग मोकळा करणारे मावळते पंतप्रधान शहबाज शरीफ व इतरांना लाहोरच्या विशेष न्यायालयाने अशाच भ्रष्टाचाराच्या खटल्यातून निर्दोष सोडले. गेल्या मेपासून तुरुंगात असलेले इम्रान पुन्हा बातम्यांच्या केंद्रस्थानी आहेत. अन्वर उल हक काकर यांच्या नेतृत्वातील काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री सरफराज अहमद बुगती यांनीच आरोप केला, की इम्रान खान न्यायालयाचे लाडके आहेत आणि त्यांना झुकते माप मिळत आहे; पण सरकार इम्रान खान यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. इम्रान व इतर २८ जणांना देश सोडून जाण्यावर निर्बंध घालावेत, अशी शिफारस उपसमितीने सरकारकडे केली आहे. इम्रान सध्या सुरक्षित अशा रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये आहेत आणि दोन बहुचर्चित खटल्यात तूर्त त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसते. त्यापैकी पहिला, गोपनीय कागदपत्रे गहाळ केल्याचा खटला कारागृहामध्येच चालणार आहे, तर अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचारप्रकरणी नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्यूरोची पोलिस कोठडीची मागणी फेटाळण्यात आली आहे.

गेल्या १४ नोव्हेंबरला एनएबीने अल-कादिर प्रकरणात इम्रान यांना अटक केली. त्यांची पत्नी बुशरा बीबी यादेखील यात आरोपी आहेत. या सनसनाटी प्रकरणाचे स्वरूप आपल्या भारतातील काळ्या पैशावरून चालणाऱ्या राजकीय हाणामारीसारखेच आहे. त्याशिवाय गोपनीय कागदपत्रांसारखे या प्रकरणालाही आंतरराष्ट्रीय संदर्भ आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाकिस्तानात अशी प्रकरणे नवी नसली तरी अल-कादिर ट्रस्टचा मामला आणखी रंजक आहे. एका बड्या भूमाफियाने पाकिस्तानात तसेच देशाबाहेर इंग्लंडमध्ये गैरमार्गाने कमावलेला प्रचंड काळा पैसा व संपत्ती पुन्हा देशाच्या तिजोरीत जमा करण्याच्या नावाखाली इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी, आदींनी यात अब्जावधीचा खेळ केल्याचा आरोप आहे. या भूमाफियाचे नाव मलिक रियाझ. इंग्लंडच्या नॅशनल क्राईम एजन्सीने २०१९ मध्ये रियाझ यांच्या काळ्या पैशाचा मनी लाँडरिंगच्या दृष्टीने तपास केला आणि तब्बल १८ कोटी पौंड म्हणजे जवळपास सात हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची तयारी चालवली. तेव्हा, हा पैसा पाकिस्तानी जनतेचा आहे असे म्हणत इम्रान खान यांचे विशेष सल्लागार बॅरिस्टर शहजाद अकबर यांनी पाक सरकारच्या वतीने मध्यस्थी केली. त्यापैकी १४ कोटी पौंड म्हणजे अंदाजे पन्नास अब्ज पाकिस्तानी रुपये पाक सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यावर जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात तो पैसा इम्रान यांच्या राजाश्रयाने पुन्हा मलिक रियाझ यांच्याच खात्यात जमा झाला. त्यापोटी पाच अब्ज रुपये इम्रान खान यांना मिळाले तसेच बुशरा बीबी आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणी विश्वस्त असलेल्या अल-कादिर ट्रस्टने विद्यापीठासाठी जवळपास ५७ एकर जमीन भूमाफियाकडून दान घेतली, असा आरोप आहे.

आपल्याकडील गुंठा, एकर, हेक्टर याप्रमाणे पाकिस्तानात करम, मरला, कनाल, किल्लाह व मुरब्बा ही एकके जमीन मोजणीसाठी वापरली जातात. एक कनाल सुमारे साडेपाच हजार चौरस फूट आणि आठ कनाल म्हणजे एक किल्लाह, अर्थात एक एकर. बहरिया टाउनमधील अशी ४५८ कनाल जमीन बिल्डरने इम्रान खान यांच्या अल-कादिर ट्रस्टला दान दिल्याचा आणि इम्रान खान यांनी त्याच दानात मिळालेल्या जमिनीवर विद्यापीठ उभारल्याचा आरोप आहे. अल-कादिर ट्रस्टच्या निमित्ताने पाकिस्तानात भ्रष्टाचाराच्या सुरस कथा चर्चेत असतानाच त्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शहजाद अकबर यांच्यावर त्यांच्या चार वर्षांच्या मुलीसमोर लंडनमध्ये दोन दिवसांपूर्वी ॲसिड हल्ला झाला. हल्ल्यात पाक गुप्तचरसंस्था आयएसआयचा हात असल्याचा आरोप म्हणजे जणू वर्तुळ पूर्ण झाले वाटावे. ते खरेच पूर्ण झाले का, हे पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्ट होईल.

Web Title: Today's Editorial: Imran Khan and Al-Qadir Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.