आजचा अग्रलेख: जंगलराजची भीती वरचढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:39 IST2025-11-15T10:39:08+5:302025-11-15T10:39:49+5:30

Bihar Assembly Election 2025 Result: २४३ सदस्यांच्या विधानसभेत पंधरा वर्षांनंतर आघाडीने दोनशेचा आकडा पार केला असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आशा पल्लवित झालेल्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसच्या महागठबंधनला चारी मुंड्या चीत केले आहे.

Today's Editorial: Bihar Assembly Election 2025 Result, Fear of Jungle Raj prevails! | आजचा अग्रलेख: जंगलराजची भीती वरचढ !

आजचा अग्रलेख: जंगलराजची भीती वरचढ !

स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक मतदानाचा विक्रम नोंदविणाऱ्या बिहारमध्ये मतदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यांचा युनायटेड जनता दल, भारतीय जनता पक्ष व या सर्वांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर पुन्हा, तोदेखील अधिक विश्वास टाकला आहे. २४३ सदस्यांच्या विधानसभेत पंधरा वर्षांनंतर आघाडीने दोनशेचा आकडा पार केला असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आशा पल्लवित झालेल्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसच्या महागठबंधनला चारी मुंड्या चीत केले आहे. त्यातही बिहारच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष प्रथमच पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. परिणामी, सजग व संवेदनशील राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहारचे पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळावे असे भाजपला वाटू शकते. अर्थात, पक्षबदलाचे विक्रम रचणारे नितीश कुमार यांना गृहीत धरणे तोट्याचे ठरेल आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचे प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार सांगितले असल्याने या महत्त्वाकांक्षेला भाजप बळी पडणार नाही.

केंद्रातील रालोआच्या सत्तेसाठी बिहार महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी २४० जागांवर खाली घसरल्याने नितीश कुमार यांचा जदयु आणि आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीच्या मदतीने सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांना सांभाळण्याचे हे महत्त्वाचे कारण. त्याशिवाय साधारणपणे ३२ ते ३५ टक्के अतिमागास समाजांवर नितीश कुमार यांचा प्रभाव, त्याला भाजपचा प्रभाव असलेल्या उच्चवर्णीय मतदारांची जोड, एकमेकांना योग्य प्रमाणात मतांचे हस्तांतरण ही मोदी-नितीश जोडी यशस्वी होण्याची प्रमुख कारणे आहेत. भाजप व जदयुचे मजबूत पक्षसंघटन, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन, योग्य उमेदवारांची निवड, प्रचाराची जोरदार रणधुमाळी, या भाजपच्या रणनीतीवर बरेचदा बोलून व लिहून झाले आहे. बिहारच्या निकालाचे विश्लेषण गेल्या वर्षभरातील नव्या पॅटर्नच्या संदर्भाने करावे लागेल. याला 'महाराष्ट्र पॅटर्न' ही म्हणता येईल. कारण, लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर भाजपने महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली अशी प्रत्येक निवडणूक अधिक ताकदीने, गंभीरपणे आणि सुनियोजितपणे लढवली. महिला मतदारांकडे अधिक लक्ष दिले. महाराष्ट्रातील लाडकी बहीण, मध्य प्रदेशातील लाडली बहना किंवा बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर एक
कोटी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये, अशा योजनांचा जोरदार प्रचार केला. महत्त्वाचे म्हणजे मित्रपक्षांना ताकद दिली. त्या ताकदीच्या बळावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात अकल्पनीय यश मिळविले. बिहारमध्ये चिराग पासवान यांचा पक्ष हिरो ठरला.

याशिवाय, मतदार यादीकडे लक्ष हे या पॅटर्नचा विशेष आहे. मतदार यादीचे विशेष गहन परीक्षण म्हणजे एसआयआर मोहीम हे यावेळच्या बिहार निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. गेली सहा महिने ही मोहीम चर्चेत व वादातही आहे. व्होटचोरीचा आरोप करीत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध आघाडी उघडली. बिहारमध्ये मताधिकार यात्रा काढली, तरीही  यशाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे निवडणूक निकालानंतर आयोगावरील हल्ले आणखी वाढतील. असो. बिहारचा मतदार राजकीयदृष्ट्या अधिक जागृत, स्वतंत्र, स्वयंभू आहे. शक्यतो अन्य राज्याचे तो अनुकरण करीत नाही. या सामूहिक स्वभावावर तेजस्वी यादव, राहुल गांधी यांची भिस्त होती. नोकरी, कामधंदा, शिक्षण, आरोग्य असे मुद्दे त्यांनी चर्चेत आणले. परंतु, लालूप्रसाद यादवांच्या काळातील 'जंगलराज'ची भीती वरचढ ठरली. हा मुद्दा भाजपने ऐरणीवर आणला. निम्म्याहून अधिक मतदारांचा जन्मच मुळात लालूंच्या सत्तेनंतर झालेला असताना हा मुद्दा चालेल का, हा प्रश्न होता. पण, तो नुसताच चालला नाही तर धावला. लालूंचा मुलगा बिहारला प्रगत, समृद्ध बनवू शकेल यावर अविश्वास निर्माण करण्यात भाजपला यश आले.

बिहारचा मतदार दिल्लीला आव्हान देताना अधिक आक्रमक होतो. म्हणूनच २०१० मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना बिहारने जनता दल युनायटेडला ११५, तर भाजपला ९१ जागा दिल्या होत्या. २०१४ मध्ये दिल्लीत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध २०१५ मध्ये पहिला कौलदेखील बिहारनेच दिला. तेव्हा लालूप्रसाद यादव व नितीश कुमार हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे शिष्य एकत्र होते. राजदला ८०, तर जदयुला ७१ जागा मिळाल्या. गेल्या, २०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार भाजपसोबत होते. रालोआला १२२ जागांचे काठावरचे बहुमत मिळाले. नंतर नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. दोन वर्षांनंतर तेजस्वीऐवजी भाजपसोबत संसार मांडला. आता हा संसार असाच चालू राहतो की काही नवे घडते, हे पाहावे लागेल.

Web Title : बिहार चुनाव: विकास पर 'जंगल राज' का डर भारी!

Web Summary : नीतीश कुमार के सामाजिक आधार, भाजपा के संगठन और रणनीतिक चुनाव प्रचार से एनडीए ने बिहार में जीत हासिल की। विकास के वादों पर 'जंगल राज' का डर भारी पड़ा। भाजपा का महिला मतदाताओं पर ध्यान और गठबंधन की ताकत रंग लाई, जो 'महाराष्ट्र पैटर्न' को दर्शाता है।

Web Title : Bihar Election: Fear of 'Jungle Raj' Overpowers Development!

Web Summary : NDA secured Bihar victory due to Nitish Kumar's social base, BJP's organization, and strategic electioneering. 'Jungle Raj' fears outweighed development promises. BJP's focus on women voters and alliance strength paid off, mirroring the 'Maharashtra Pattern'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.