तालिबान्यांनी काढली पाक सैनिकांची इज्जत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:51 IST2025-10-20T04:51:22+5:302025-10-20T04:51:28+5:30
अनेक पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी पळवून लावलं.

तालिबान्यांनी काढली पाक सैनिकांची इज्जत
ज्या पाकिस्ताननं अनेक वर्षं तालिबानला पोसलं, त्यांना शस्त्रास्त्रं पुरवली, प्रशिक्षण दिलं, मोठं केलं, त्याच तालिबानबरोबरपाकिस्तानचे आता खटके उडताहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात पाकिस्ताननं काबूलमधील तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) काही ठिकाणांवर हल्ला केला. त्यामुळे तालिबानीही चिडले आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर पलटवार केला. अनेक पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी पळवून लावलं.
या संघर्षात तालिबानी लढवय्यांनी पाकिस्तानी सैनिकांच्या पँट्सही उचलून आणल्या आणि आम्ही पाकिस्तानवर कसा विजय मिळवला, त्यांची कशी पळता भुई थोडी केली हे दाखवताना विजयाचं प्रतीक म्हणून भर चौकात त्यांच्या पँट्स त्यांनी लटकावल्या! सोबतच पाकिस्तानी सैनिकांची जप्त केलेली शस्त्रंही त्यांनी लोकांच्या ‘प्रदर्शना’साठी ठेवली आहेत. सोशल मीडियावर हे फोटो फारच व्हायरल होत आहेत.
पाकिस्ताननं अनेक वर्षे अफगाण तालिबानला समर्थन दिलं, त्यांचं लांगुलचालन केलं; पण सत्तेवर आल्यानंतर तालिबाननं पाकिस्तानच्या अपेक्षेप्रमाणे सहकार्य केलं नाही, यामुळे पाकिस्तान नाराज आहे. तालिबाननं २०२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर, टीटीपीचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानात आसरा घेत आहेत, असा पाकिस्तानचा आरोप आहे. टीटीपी हा पाकिस्तानविरोधी तालिबानी गट आहे, जो पाकिस्तानमध्ये हल्ले करतो. दुसरीकडे, तालिबानचा आरोप आहे की, पाकिस्तान अमेरिकेला ड्रोन हल्ल्यांसाठी आपले हवाई क्षेत्र वापरू देतो. यावरून अलीकडच्या काळात दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ड्युरंड लाइन ही आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तान मानतो; पण अफगाणिस्तानातील तालिबान ती पूर्णपणे मान्य करत नाही. पाकिस्ताननं सीमेवर कुंपण बांधायला सुरुवात केली, पण तालिबाननं काही ठिकाणी ती तोडली. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमकी होऊ लागल्या.
सध्या सुरू असलेल्या संघर्षाबाबत बीबीसीच्या पत्रकारानंही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यात तालिबान लढवय्यांनी पाक सैनिकांच्या पॅण्ट आणि शस्त्रं विजयाचं प्रतीक म्हणून चौकात ठेवल्या आहेत. तालिबानच्या प्रत्युत्तरानंतर काही पाकिस्तानी सैनिक ड्युरंड लाइनजवळील आपल्या सैनिकी चौक्या सोडून पळून गेले होते. तालिबान लढवय्यांनी त्या चौक्यांमधून पॅण्ट आणि शस्त्रं जप्त केली आणि त्यांना विजयाची निशाणी म्हणून सादर केलं. पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमध्ये बुधवारी काबूल आणि कंदहारमध्ये १५ अफगाणी नागरिक ठार आणि १००पेक्षा जास्त जखमी झाले होते. यानंतर अफगाणिस्ताननं सीमेवर टँक पाठवले होते.
पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर अफगाणी लोकांनीही तालिबानी लढवय्यांच्या हातात हात मिसळले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, पाकिस्तान पुन्हा आमच्या वाट्याला गेला, तर तालिबानी लढवय्यांसोबत आम्हीही पाकिस्तानची अशीच जिरवू!
दोन्ही देशांमधील वादाचं मूळ कारण ड्युरंड लाइन आहे, जी ब्रिटिशकाळात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान ओढण्यात आली होती. ही रेषा दोन्ही देशांच्या पारंपरिक जमिनी विभाजित करते आणि दोन्ही बाजूंचे पठाण ती कधीही स्वीकारत नाहीत.