भाषेची भांडणं सोडा, मुलांच्या हाती आपल्या भाषेची पुस्तकं द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:14 IST2026-01-15T09:13:02+5:302026-01-15T09:14:36+5:30
मुलांना मातृभाषेबद्दलच्या उपदेशाचे डोस पाजत बसू नका. एकच करा : मुलांना पुस्तक मेळ्यात न्या आणि रोजच्या व्यवहारात आपली भाषा हरघडी वापरू लागा.

भाषेची भांडणं सोडा, मुलांच्या हाती आपल्या भाषेची पुस्तकं द्या!
योगेंद्र यादव
राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
हिंदीवर आपलं प्रेम असेल तर आपल्या मुलांच्या मनात आपल्या भाषेविषयी ओढ निर्माण व्हावी; त्यांना हिंदी बोलण्याचीच नव्हे, ती लिहिण्यावाचण्याचीही गोडी लागावी, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या दृष्टीने हिंदी ही केवळ हलक्याफुलक्या गप्पा मारण्याचीच नव्हे, तर स्वतःला आणि जगाला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची भाषा बनायला हवी. हिंदी बोलण्याची त्यांना लाज वाटू नये. कारण नसताना दरवेळी, मोडकी-तोडकी इंग्रजीच त्यांच्या तोंडी येऊ नये. मी जे हिंदीबद्दल म्हणतो आहे, ते मराठीसह प्रत्येकच भारतीय भाषेबद्दल खरं आहे.
हे व्हायचं तर प्रत्येक भाषेत चांगलं बालसाहित्य उपलब्ध झालं पाहिजे, त्यासाठी एकतर उत्तमोत्तम साहित्यिकांनी मुलांसाठी लिहायला हवं किंवा मुलांसाठी लिहिणाऱ्यांना साहित्याच्या दरबारात प्रतिष्ठा मिळायला हवी. या दोन्हींची हिंदीत नेहमीच वानवा राहिली आहे. इंग्रजीत बालसाहित्याला मानाचं पान आहे. हॅरी पॉटरकार जे. के. रोलिंग किंवा 'द ग्रफलो'ची लेखिका ज्युलिया डोनाल्डसन यांना जगभर सन्मान लाभतो. बंगाली, मराठी आणि मल्ल्याळीतही बालसाहित्याची परंपरा आहे. याउलट हिंदीतील बालसाहित्यिकाला त्याच्या गल्लीतही कुणी विचारत नाही. छोट्या मुलांसाठी केलेल्या लेखनाला साहित्यिक वर्तुळात दुय्यम मानलं जातं. परिणामी हिंदी बालसाहित्य बरीच दशकं ठप्प झालं होतं. तोच तो चंदामामा, नंदन, चंपक आणि चाचा चौधरी, बेताल आणि अमर चित्रकथा किंवा मग अकबर बिरबल, पंचतंत्र किंवा पौराणिक कथांवर आधारित सरधोपट पुस्तकं. 'इंग्रजी' हीच आधुनिकता मानली जाते. त्यामुळे इंग्रजीतून अनुवादित केलेल्या कथा मुलांना शिकवल्या जातात. त्यातील संदर्भ, कथाविषय आणि पात्रं यांचा मुलांच्या भावजीवनाशी सुतराम संबंध नसतो.
सुदैवाने ही परिस्थिती आता पालटते आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत भारतीय बालसाहित्याने कात टाकली आहे. इंग्रजी बालसाहित्यापासूनच याची सुरुवात झाली. सोनेरी केस असलेल्या निळ्या डोळ्यांच्या गोऱ्या मुलांच्या जागी आपल्या काळ्यासावळ्या मुलांच्या लोभस किंवा सुख-दुःखाने भरलेल्या आयुष्यावर गोष्टी लिहिल्या जाऊ लागल्या. पूर्वी भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट आणि चिल्ड्रन बुक ट्रस्टनेही असे काम सुरू केले होते. दिल्लीत चालू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यात या नव्या हिंदी साहित्याची झलक दिसते. इंग्रजी किंवा इंग्रजीतून अनुवादित साहित्याच्या झगमगाटातून सुटून 'एकतारा' किंवा 'एकलव्य' यांचे साधेसुधे स्टॉल्स शोधू शकलात तर हिंदी बालसाहित्याची नवी झळाळी तुमच्या दृष्टीस पडेल. अगदी लहान मुलांसाठी शब्दविरहित चित्रकथा, नाना आकारांतील नाना प्रकारची गोष्टींची आणि गाण्यांची पुस्तकं, पोस्टर, कॅलेंडर, कविता लिहिलेली कार्ड, किशोरांसाठी कादंबऱ्या आणि इतरही बरंच काही इथं आहे. बालकांसाठी 'प्लुटो' आणि किशोरांसाठी 'सायकल' ही त्यांची बालमासिकं तर तुम्हालाही वाचायला आवडतील. ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिनाच असलेलं 'चकमक' हे मासिक तर प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य करायला हवं असंच आहे. प्रथम बुक्समध्ये भारतीय वातावरण चित्रित करणारी हिंदीतील सुंदर आणि आकर्षक पुस्तकं आहेत. हिंदीतील बड्चाबड्या व्यावसायिक प्रकाशकांना मात्र अद्याप बालसाहित्यात रस निर्माण झालेला नाही.
खुशखबर अशी की हिंदीतील प्रख्यात साहित्यिकही बालसाहित्य लिहू लागले आहेत. गुलजार तर गेली कित्येक दशकं मुलांसाठी लिहीतच आलेले आहेत. विनोद कुमार शुक्ल या नुकत्याच निवर्तलेल्या ख्यातनाम हिंदी साहित्यिकांनी, आयुष्याच्या शेवटी-शेवटी मुलांसाठी कथा, कविता आणि कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. अरुण प्रकाश, प्रियंवद, राजेश जोशी, असगर वजाहत, प्रयाग शुक्ल, कृष्ण कुमार, उदयन वाजपेयी आणि लाल्टू हे हिंदीतील महान साहित्यिकसुद्धा आता मुलांसाठी लिहू लागले आहेत. चित्रं हा मुलांसाठी असलेल्या पुस्तकांचा प्राण असतो. या क्षेत्रातही हिंदीत नवे चित्रकार दिसतात. मुलांची पुस्तकं त्यांच्यामुळे अधिकाधिक आकर्षक बनत आहेत.
ही झाली हिंदीची कहाणी. अन्य भारतीय भाषांमध्येही असं शुभवर्तमान असो. तुम्ही दिल्लीच्या या किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक मेळाव्यात जरूर जा. मुलांना वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या भाषेतली पुस्तकं द्यायला सुरुवात करा. खोटे दावे करणे सोडून द्या. इतर भारतीय भाषांवर दादागिरी करू नका. मुलांना मातृभाषेबद्दलच्या उपदेशाचे डोस पाजवत बसू नका. एकच करा. रोजच्या व्यवहारात आपली भाषा हरघडी वापरू लागा.