विशेष: पाण्याचा हिशोब ठेवणारा द्रष्टा ऑडिटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:38 IST2025-08-31T10:37:33+5:302025-08-31T10:38:21+5:30

नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले !

Special: The visionary auditor who keeps track of water | विशेष: पाण्याचा हिशोब ठेवणारा द्रष्टा ऑडिटर

विशेष: पाण्याचा हिशोब ठेवणारा द्रष्टा ऑडिटर

मुलखावेगळी माणसे
दिनकर गांगल

नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! जलसंवर्धन जेवढे महत्त्वाचे, तेवढीच उपलब्ध पाणी पुरवून-पुरवून वापरण्याची दृष्टी महत्त्वाची हे त्यांना कळले. तोच मुद्दा घेऊन त्यांनी गेल्या बारा-पंधरा वर्षांत प्रचाराचे रान उठवले आहे. नुसत्या ‘बजेटिंग’वर साठ कार्यशाळा घेतल्या. त्याचबरोबर पाणी या द्रव्याचा सर्वांगीण अभ्यास केला. ते त्या विषयावर किमान साडेतीन तास अखंड भाषण करू शकतात.- एकाही श्रोत्याला कंटाळा येत नाही. उलट, अनेक माणसे पाणी बचतीस प्रवृत्त होतात. त्यांनी त्या भाषणातील चार-चार ओळींच्या ग्राफिटी तयार केल्या आणि व्हॉट्सॲपवरून साडेतीन हजार लोकांना पाठवल्या. एकाही माणसाने वर्षभरात तो ‘ग्रुप’ सोडला नाही !

ते रोटरी सभासद आहेत. त्यांनी पुणे डिस्ट्रिक्टच्या एकशे नऊ क्लबना जलप्रबोधनाने पाणी बचत मोहिमेत जोडून घेतले. त्यातून गेल्या सात वर्षांत पुणे शहराबरोबरच एकशे सेहेचाळीसपेक्षा अधिक गावांत पाणीसंबंधात कार्य उभे राहिले आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायातील अर्थ मूव्हिंग मशीन एक वर्षभर वेगवेगळ्या गावांना पाणीसंबंधित कार्यासाठी विनामूल्य दिले, त्यातून सात गावे त्या मशीनच्या मदतीने जलस्वयंपूर्ण झाली !

त्यांनी वृत्तपत्रांत दीडशेहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यातून ‘जलनायक’सारखे पुस्तक तयार झाले. त्यांनी पाण्यावरच गावोगावी सहाशेपेक्षा अधिक भाषणे केली आहेत. यूट्यूबवर त्यांचे पाणी प्रबोधनावर चाळीस कार्यक्रम आहेत. ताजा ‘कॅन्सर ट्रेन’ हा कार्यक्रम हृदय व मेंदू फाडून टाकतो. पंजाबमधील भटिंडा ते राजस्थानातील जयपूर ही ट्रेन कॅन्सर पेशंट्सची भरलेली असते. ती कहाणी सांगता-सांगता सतीश खाडे कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यातही शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे प्रमाण जास्त का? तर त्याचे कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर हे पटवून देतात. म्हणजे जेथे पाणी पुरेसे आहे तेथेही माणूस शहाणपणाने वागत नाही. तो त्या पाण्याचा वापर करून रोग फैलाव करत राहतो.

सतीश यांनी केलेले अभ्यास मोठमोठे आहेत. त्यांनी चार हजार आठशे दहा लोकांकडून प्रश्नावली भरून घेतली व ते निष्कर्ष राष्ट्रीय परिषदेत मांडले. तेथे त्या निबंधाचे कौतुक झाले. त्यांनी एकशे बावीस गावांचे ‘वॉटर ऑडिट’ गावकऱ्यांकडून करवून घेतले आणि त्या गावांना त्यांची जलस्थिती पटवून दिली. त्यांना पर्यावरण रक्षकसारखे सात प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार लाभले आहेत.

जलसप्ताहासारखे कार्यक्रम योजून लोकांना आकृष्ट करण्याचे तंत्रही सतीश यांनी अचूक अवलंबले आहे. तेथे जलप्रबोधनाविषयी कार्यक्रम होतात, रोटरी वॉटर अवॉर्ड, जलदुर्गा असे पुरस्कार दिले जातात. वॉटर ऑलिंपियाड भरवून मुलांना त्या वयातच जलसाक्षर केले जाते. कारण उद्याच्या पाणीटंचाईची झळ त्यांनाच जास्त सहन करावी लागणार आहे!

Web Title: Special: The visionary auditor who keeps track of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.