विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम!
By यदू जोशी | Updated: April 4, 2025 09:45 IST2025-04-04T09:44:35+5:302025-04-04T09:45:11+5:30
Raj Thackeray: राज ठाकरे यांची मते ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्याइतपत मते देऊ लागेल त्या दिवशी ते भाजपलाही जड जातील, हे खरे!

विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम!
- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)
इतिहास हे कालचे वर्तमान असते तर भविष्य हे उद्याचे वर्तमान. इतिहासाची मोडतोड आपल्या हिशेबाने करायची आणि कालचे वर्तमान वादग्रस्त करायचे त्याऐवजी उद्याच्या वर्तमानाचा वेध घेणे कधीही चांगले. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शहाणपण लवकर आले तर बरे होईल.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला याबाबत उपदेशांची गुढी उभारली. राज यांच्या पक्षाला लोक मते देत नाहीत हे खरे; पण त्यांची मते ऐकायला गर्दी होते. आजवरच्या त्यांच्या भाषणांपैकी सर्वांत अप्रतिम असे परवाच्या भाषणाचे कौतुक झाले. इतके परखडपणे बोलणारा दुसरा कुणी नेेता आज महाराष्ट्रात नाही; पण एकाच भाषणात विरोधाभासी भूमिका घेतली गेली तर त्या परखडपणावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
‘धर्माच्या नावावर कोणताही देश उभा राहू शकत नाही, हे आता इस्लामिक देशांनाही कळू लागले आहे’ याचे दाखले राज ठाकरेंनी दिले. भाषणाची सुरुवात मात्र त्यांनी ‘जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी केली. एकजूट व्हा, हिंदू म्हणून अंगावर जाण्याची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले. त्यांच्या सभेला मोठी गर्दी उसळली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार आदरपूर्वक राज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. त्यावरून काहीतरी वेगळे वाटले. पूर्वी बाळासाहेब ठाकरे विविध विषयांवर मतप्रदर्शन करत असत, राज यांना बाळासाहेबांच्या चौकटीत नेऊन बसविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. ठाकरे म्हणून उद्धव जेवढे झाकोळले जातील आणि ठाकरे म्हणून राज जेवढे पुढे जातील तेवढे चांगले असा भाजपचा विचार असू शकतो.
मिळालेली मते आणि कोणत्याही निवडणुकीत जिंकून आलेल्या जागा याआधारे राजकीय पक्षांना कव्हरेज द्यायचे असे माध्यमांनी ठरविले तर राज यांचा क्रमांक बसपाच्याही खालचा असेल; पण ‘मते’ मिळत नसूनही ‘मॅग्नेट’ कायम असल्याने राज यांची दखल माध्यमांना घ्यावीच लागते.
राज म्हणतात त्याप्रमाणे धर्माच्या नावावर देश उभा राहू शकत नसला तरी सत्ताकारण नक्कीच उभे राहू शकते आणि ते त्यांना चांगलेच कळते म्हणून तर ते ‘हिंदुत्व हिंदुत्व’ करतात. काँग्रेसला दिलेली साथ, ‘वक्फ’च्या बिलावरून घेतलेली भूमिका यावरून भाजप पुढील काळात उद्धव ठाकरे यांना अधिकाधिक टार्गेट करत जाईल आणि हिंदुत्वाचा राग आळवत राज हे उद्धव यांची जागा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील असे दिसते. भाजपचे थेट शत्रू हे उद्धव ठाकरे आहेत, राज हे त्यांच्या किंवा भाजपच्या सोयीनुसार कधी मित्र, तर कधी विरोधक आहेत; शत्रू तर नक्कीच नाहीत. पण, एक मात्र खरे- राज ठाकरे यांची मते ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्याइतपत मते देऊ लागेल त्या दिवशी ते भाजपलाही जड जातील.
ना मोदी कळले, ना संघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील रेशीमबागच्या संघ कार्यालयात गेले, त्यानंतर तर्काधारित काही इंटरेस्टिंग बातम्या आल्या आणि असा दावा केला गेला की, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांची बंदद्वार चर्चादेखील झाली. अशी चर्चाच प्रत्यक्षात झालेली नव्हती. बिनबुडाच्या बातम्या आल्या त्या अशा..
१) मोदी यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना सांगितले की, ७५ वर्षांचा झालो तरी मी पंतप्रधानपद सोडणार नाही. २) मोदी यांना वयाच्या पंचाहत्तरीनंतर पद सोडायला भागवत यांनी सांगितले. ३) मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असतील यावर चर्चा झाली. ४) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर चर्चा झाली. ५) अखेर संघासमोर मोदी झुकले, संघ मुख्यालयात आले वगैरे वगैरे...
- ज्यांना संघ कशाशी खातात हे माहिती नाही त्यांनी अशा बातम्या दिल्या. मोदी केवळ सोळा मिनिटे रेशीमबागेत होते. मोदी-भागवत यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचे चित्रही रंगविले गेले. संघाचा अजेंडा अटलबिहारी वाजपेयी राबवू शकले नाहीत. (राममंदिर, ३७० कलम वगैरे) पण, मोदींनी तो तंतोतंत राबविला. ‘वक्फ’चे विधेयक हे त्याचेच पुढचे पाऊल आहे. समान नागरी कायदा हा त्यापुढचा टप्पा असेल. संघ आणि विशेषत: स्वयंसेवकांच्या मनात एक खंत होती ती ही की, मोदी अजून संघ मुख्यालयात गेले नाहीत, तीही परवाच्या भेटीने दूर झाली. तरीही निराधार बातम्यांची पेरणी का केली जात असावी? एकतर संघाची कार्यशैली माहिती नसावी किंवा ती माहिती असूनही संघाबाबत मसालेदार बातम्याच कागदावर उतरतील अशी रिफील पेनात भरली जात असावी!
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात कधीही न झालेल्या बंदद्वार चर्चेत काय घडले, ते संजय राऊत यांना कळले आणि मग राऊत यांच्या हवाल्याने माध्यमांनी त्यावर बातम्या केल्या, असा सध्याचा काळ असताना मोदी-भागवत भेटीबाबत आडवे-तिडवे लिहिले गेले तर नवल ते काय?
yadu.joshi@lokmat.com