विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 08:30 IST2026-05-16T08:29:03+5:302026-05-16T08:30:19+5:30
‘मेट गाला’च्या त्या सुप्रसिद्ध पायऱ्यांवर एखादी ‘कला’ झळकते, तेव्हा मान-पाठ एक करून त्यासाठी राबलेल्या कारागिराच्या हाती चार जास्तीचे पैसे पडतात का?

विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
-सुषमा सबनीस (कला समीक्षक आणि संपादक)
एखादी गोष्ट साजरी करताना ती गोष्ट साकारणाऱ्याचं अस्तित्व आणि श्रेय सहज पुसून टाकण्याची किमया अनेकांना साध्य असते. ‘मेट गाला’ या अत्याधुनिक वस्त्र-प्रदर्शनाला ती अगदी तंतोतंत साधली आहे.
नोएडा किंवा मुंबईतल्या एखाद्या कारखान्यात सुमारे ८० कारागीर तीन तीन महिने राबून एखादं वस्त्र विणतात. रबरासारख्या चिवट कापडावर सोन्याच्या धाग्यांचं नाजूक विणकाम करताना त्या कारागिरांची मान-पाठ अक्षरशः एक होते. नंतर एखादा सेलिब्रिटी त्या वस्त्रापासून तयार झालेले ‘डिझाइनर’ कपडे घालून ‘मेट गाला’च्या त्या सुप्रसिद्ध पायऱ्यांवर दिमाखात ‘पोझ’ देत उभा राहातो.
जगभरातले कॅमेरे त्याचे फोटो टिपतात. त्या डिझाइनर कपड्यांची, त्यावरच्या पेंटिंग्जची आणि ते कपडे डिझाइन करणाऱ्या डिझाइनरचीही खूप चर्चा होते, मात्र त्या चर्चेत मान मोडून एक एक सोन्याचा धागा विणून ते वस्त्र विणणाऱ्या कारागिराचा मात्र सगळ्यांना विसर पडतो. हे चूक आहे हेही कुणाच्या लक्षात येत नाही, उलट अगदी सहज, शांतपणे ती चूक होते आणि हेच जास्त धोकादायक आहे.
‘अड्डा फ्रेम’वर वाकून तासन्तास काम करणारा तो कारागीर या गोष्टीचा एक छोटासा भाग नाही, खरं तर तोच ती संपूर्ण गोष्ट आहे. कारण त्याच्या हातात असलेली कला जगातल्या कुठल्याही ‘फॅशन हाउस’पेक्षा जुनी आहे. ‘जर्दोजी एम्ब्रॉयडरी’ एकेकाळी मुघलांच्या दरबारातले तंबू आणि राजा-महाराजांच्या हत्तींच्या सजावटीसाठी वापरली जात असे. अनेक साम्राज्यांच्या आयुष्यातील चढउतार, वसाहत काळातील भेदभाव, फाळणी, गरिबी आणि महामारी.. काय काय नाही पाहिलं या कलेने तिच्या आयुष्यात?
पाचशे वर्ष जुनी कला आणि त्या कलेचा समृद्ध वारसा गाठीशी असलेल्या या कारागिरांच्या हाती मात्र अनेकदा त्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पुरेसे पैसेही नसतात. दुसरीकडे त्याच कारागिराने महिनोन्महिने खपून विणलेल्या वस्त्रापासून तयार झालेला एखादा ‘डिझाइनर ड्रेस’ तिकडे ‘मेट गाला’मध्ये झळकला की त्याची किंमत वाढते आणि प्रतिष्ठाही, पण ती किंमत किंवा प्रतिष्ठेतलं काहीच त्या कारागिराच्या वाट्याला येत नाही.
यावर्षी एका भारतीय डिझाइनरने कारागिरांची नावं त्या कपड्यांच्या आत एम्ब्रॉयडरीने कोरून घेतली. कारागिरांप्रति ही एवढी संवेदनशीलताही फॅशन उद्योगात दुर्मीळ. या छोट्या कृतीची दखल जरूर घेतली जावी. पण कारागिराचं कोरलेलं नाव कुणाच्याही नजरेला कधीच पडणार नसेल तर ते श्रेय देणं नाही, फक्त स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला जागणं आहे. अदृश्य हातांना मान देणं, पण त्यांना कधीही लोकांसमोर येण्याची संधी न देणं ही फॅशन उद्योगाची जुनीच
खोड आहे.
अनेक चित्रकर्त्यांनाही हे काहीसं ओळखीचं वाटेल. राजा रविवर्मा यांनी भारतीय चित्रकलेला सर्वसामान्यांपर्यंत नेलं. देवी-देवतांची चित्रं त्यांनी छापील स्वरूपात आणली आणि घराघरांत पोहोचवली. कला राजेरजवाड्यांच्या महालांबाहेर नेली म्हणून राजा रविवर्मा आयुष्यभर वसाहतवाद्यांच्या टीकेचे धनी ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर शंभरेक वर्षांनी आता त्यांची चित्रं पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करत उच्चभ्रूंच्या जगात, दिवाणखान्यात आणि त्यांच्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये झळकताना दिसतात. म्हणजे जी कला सर्वसामान्यांसाठी होती ती पुन्हा मुठभर श्रीमंतांचीच होण्याकडे परत जाताना दिसते. हा विरोधाभास नाही. कुणीतरी जाणूनबुजून, प्रयत्नपूर्वक हे दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत हे अटळ आहे.
‘मेट गाला’सारख्या ठिकाणी कलेचा वापर फॅशनसाठी करण्यातून लोक कलेकडे फक्त ‘ॲस्थेटिक बॅकड्रॉप’ म्हणून पाहायला लागतात. एखादं चित्र रेड कार्पेटवर पाहिल्यानंतर संग्रहालयात जाऊन त्या चित्रासमोर जाऊन उभं राहाण्याची, ते न्याहाळण्याची गरज त्यांना वाटेनाशी होते. ‘गाऊन’ हा ‘गॅलरी’ची जागा घेतो आणि ‘स्क्रोल’ हा ‘प्रत्यक्ष अनुभवण्याची’ गरज संपवतो. कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते खरी; पण तिचं महत्त्व आणि किंमत कमी होते.
कारागिरांसाठी तर हे समीकरण अधिकच वाईट आहे. त्यांच्या कामातून निर्माण होणारा पैसा आणि प्रतिष्ठा फॅशन उद्योगातले डिझाइनर, फॅशन हाउस, सेलिब्रिटी, इव्हेंट असा सर्वत्र पोहोचतो; पण कारागिरांच्या हातात मात्र तो जात नाही. ती पिळवणुकीची जुनीच पद्धत आहे. कारागिरांची नावं कपड्यांच्या आत नाही तर प्रत्येक प्रेस रिलिजमध्ये खुलेपणाने लिहिली गेली, पैसे फक्त ब्रॅण्ड्सना नाही तर कारागिरांनाही मिळाले, तरच किमान न्याय होईल.
sushmasabnis1@gmail.com