मित्रांमधील सातारी कटुता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 04:40 IST2026-03-24T04:40:16+5:302026-03-24T04:40:58+5:30
नांदा सौख्यभरे आणि भांडाही सौख्यभरे असेच चालू राहील.

मित्रांमधील सातारी कटुता
‘शिंदेंच्या शिवसेनेशी आमची नैसर्गिक युती आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आमची व्यावहारिक युती आहे’, असे विधान मागे एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, व्यावहारिक युती सरळ; सुटसुटीत चाललेली असताना नैसर्गिक मित्राशी मात्र भाजपचे खटके उडत असल्याचे चित्र दिसते आहे. व्यवहारात अडचणी येत नाहीत, कारण त्यात दोघांचाही फायदा असतो, प्रेमात अडचणी येतात, कारण प्रेमात फायदा-तोट्याऐवजी इगो अधिक असतात. भाजप-शिंदेसेना यांचे फारच गूळपीठ राहील आणि राष्ट्रवादीला सांभाळून घेताना मुख्यमंत्र्यांची कसरत होईल, असे फार आधी वाटले होते.
भाजपच्या गणगोतातही शिंदेसेनेविषयी प्रेम होते आणि राष्ट्रवादीबद्दल ‘ही ब्याद कशाला ओढवून घेतली’ अशीच भावना होती. मात्र, प्रत्यक्ष सत्ता चालवताना आता राष्ट्रवादी हाताळायला सोपी, तर शिंदेसेना अवघड असेच भाजप आणि मुख्यमंत्र्यांनाही वाटत असणार. भाजप आणि शिंदेसेनेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुरघोडी करण्याचे प्रयत्न अधूनमधून होत असतात. महापालिका निवडणुकीत विशेषत: मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) कल्याण-डोंबिवलीपासून विविध ठिकाणी दोघांनी एकमेकांना चीत करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नव्हती.
एकनाथ शिंदे यांची आक्रमक शैली आणि पक्षविस्तारासाठीचे जोरकस प्रयत्न यातून भाजपलाही त्यांच्याविषयी असुरक्षितता वाटत राहते. दोघांची व्होटबँक सारखी आहे, राष्ट्रवादीकडून ती भीती नाही. भाजपच्या गडात घुसून धक्के देण्यासही शिंदे मागेपुढे पाहत नाहीत. दुसरीकडे शिंदेसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडूनही अनेकदा केला जातो. विशेषत: डोंबिवलीचे नेते रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोन पक्षांमधील तणातणी अधिकच वाढलेली आहे. डोंबिवली-ठाण्याच्या राजकारणात एकमेकांना शह-काटशह ते आधीही देत होते, चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्याची व्याप्ती वाढली आहे. पूर्वीच्या एकत्रित शिवसेनेला भाजप आपल्याला गिळेल अशी भीती वाटायची ती आज भाजपबद्दल शिंदेसेनेला वाटते.
आपल्या प्रादेशिक मित्रांना आपल्या काबूत ठेवण्याचे राजकारण काँग्रेसने पूर्वी अनेकदा केले, आता ते भाजप करताना दिसतो. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपशी मैत्री असतानाही भाजपबद्दल सर्वांत सावध असते ती शिंदेसेनाच. त्याचवेळी भाजप हा राष्ट्रवादीपेक्षा शिंदेसेनेबाबत सतर्क असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोघांमध्ये पाडापाडीचे राजकारण झालेच होते. त्यातच आता दोन मित्रपक्षांमधील कटुतेचा नवा सातारी अध्याय सुरू झाला आहे. तेथे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत दोन पक्षांमध्ये जो अभूतपूर्व राडा झाला, त्यातून निर्माण झालेला बेबनाव सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापर्यंत पोहोचला.
मंत्री शंभूराज देसाई-मंत्री मकरंद पाटील विरुद्ध मंत्री जयकुमार गोरे-शिवेंद्रराजे असा वाद चव्हाट्यावर आला. मकरंद पाटील हे अजित पवार गटाचे, पण तेथे खरा वाद होता तो शंभूराज देसाई विरुद्ध भाजप असाच. हल्लीच्या राजकारणात जी दबंगगिरी वाढलेली आहे तिला ना भाजप अपवाद, ना शिंदेसेना. फक्त त्या-त्या प्रसंगात कोणी कोणावर भारी पडले तेवढेच बघायचे. सातारामध्ये भाजपने शिंदेसेनेवर कुरघोडी करताना शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. मित्रपक्षातील आमदाराच्या पत्नीला अध्यक्ष करून मित्रावर मात करण्याचा हा नवीन फंडा तेथे बघायला मिळाला.
सातारचे राजकारण तसे प्रस्थापितांचे, त्यात एकमेकांना विस्थापित करण्यासाठी डावपेच खेळण्यात सगळेच वस्ताद. पोलिसांनी केलेल्या धक्काबुकीत आपण कसे जखमी झालो, ते शंभूराज देसाई यांनी सांगितले आहेच. दोन मित्रपक्ष एकमेकांना धोबीपछाड देत असताना यापूर्वी कधीही प्रकरण इतके हातघाईवर गेलेले नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे, ती उद्या होईलही; पण या निमित्ताने दोन पक्षांनी एकमेकांना ज्या जखमा केलेल्या आहेत, त्याचे पडसाद इतरत्र उमटणार नाहीत याची खात्री देता येत नाही.
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजून बाकी आहेत आणि तिथेही निवडणूकपूर्व आणि निवडणुकोत्तर दोघांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर ताणायचे पण तुटू द्यायचे नाही ही दोन्ही पक्षांची मजबुरी आहे. पुढच्या साडेतीन वर्षांत एकमेकांची साथ सोडून देण्यास कोणताही वाव नाही. असे असले तरी सातारसारखे प्रसंग घडत राहतील, दोघांमध्ये खेचाखेची होत राहील. तोडणे दोघांनाही परवडणारे नसेल. त्यामुळे नांदा सौख्यभरे आणि भांडाही सौख्यभरे असेच चालू राहील.